Breaking News

स्वागत करू या नववर्षाचे!

धर्म कोणताही असो; पंथ कोणताही असो, सांप्रदाय कोणताही असो, नवीन विचारांचे – नव संकल्पांचे स्वागत हे सर्वांनीच आजपर्यंत मोठ्या उत्साहाने केले आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम सर्वांना मान्य करावा लागतो. काळ बदलतो तसे विचारही बदलतात. रोजचा दिनही काहीतरी नवीन बरोबर घेऊन उगवतो आणि पुन्हा जुन्या घटनांना बुडवून नवीन प्रभात घेऊन जन्मास येतो. भारताने नेहमीच सर्वांना आपल्या कक्षेत सामावून घेतले आहे. भारत शकांचा, मन्वन्तरांचा, तसेच इसवींचाही सन मोठ्या उत्साहाने साजरा करतो. असो, प्रारंभ महत्त्वाचा आहे. प्रारंभ म्हणजे सुरुवात! मागील चांगल्या-वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन रविउदयी नवसंकल्पांचे अवलंबन करणे, त्यांचे निश्चित धोरण ठरवणे, सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने, नव उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत. जगात निसर्गाकडून नेहमीच माणसाला काहीतरी शिकायला मिळत असते. आपण उगवता आणि मावळता सूर्य नेहमीच पाहतो. तो आपल्याला नेहमीच सतेजही दिसतो, परंतु तो आपल्याला काहीतरी सांगत असतो. अरे माणसा, मला नुसता तू पाहू नकोस. माझ्याबरोबर माझ्या वेगात, माझ्या तेजात एकरूप होऊन जा. बघ, तू उठला नाही तरी मी उठलो. आधीच्या दिवसांचा, विचारांचा, प्रसंगी आलेल्या रागाचा त्याग करून पुन्हा मनी नवतारुण्य धारण करून प्रकाशाच्छित अवस्था मी प्राप्त करून घेतली आहे. तर तूही मनुष्या माझ्याबरोबर ऊठ. जुने राग-लोभ-द्वेष विसरून जा आणि नवशक्तीने प्रसन्न होऊन चालू लाग, पण मनुष्याचे त्याच्याकडे जराही लक्ष नाही.

पुन्हा तो दिनकर आपल्याला काहीतरी

सांगतो. बघ जरा, मी जे सुविचार प्रकाशाच्छित केलेत ते आता स्थिर झाले आहेत. दिन मध्यमावर झालेल्या श्रमातून थोडासा आराम म्हणजेच मनाला स्थिर कर. हातून घडलेले कर्मात साठव. त्याचे तोल-मापन कर आणि त्याच प्रसन्नतेने मझ्याबरोबर चालत राहा, पण मनुष्य दुपारचे भोजन करून निजला आणि रवि पुढे चालत राहिला.

तरीही हा राग मनी न बाळगता. दिनकर त्याच्या उत्साहात त्याला सांगत आहे की, बघ, आता सांजसमयी वाईट विचार मनात येऊ देऊ नकोस. कारण रात्र तुझी नाही, ती वैर्‍याची आहे. हा रात्रीचा अंध:कार तुझ्या चैतन्याला, तेजाला गिळून टाकेल. तुझा तो सर्वनाश करेल. तू घाबरू नकोस. त्या अंध:कारावर विजय मिळव. जसा दिवस सोन्याचा म्हणजेच श्रमाचा घालवलास तशी रात्रही घालव आणि जरासा म्हणजे क्षणिक तूच काळाबरोबर विसंगती चाखून पुन्हा माझ्याबरोबर दुसरा दिवस दुप्पट तेजाने, चैतन्याने, संकल्पपूर्तीच्या उत्साहाने चालू लाग, पण आपले या सूर्याच्या, दिनकराच्या शिकवणीकडे मुळीच लक्ष नसते. मनुष्य हा मुळातच आळशी आहे. तो इतर प्राण्यांसारखा सावध कधीच नसतो, तर त्याला सतत सावध ठेवण्यासाठी हे दिन, मास, महिने कार्य करीत असतात.

प्रत्येक युगाचा, शतकाचा, वर्षाचा दिवस आपल्याला हेच तर सांगत असतो की, अरे बाबा, मागचे वाईट सगळे विसर. उपवास, दानधर्म, प्रार्थना याहून अधिक चांगले कृत्य म्हणजे तू सतत क्षमाशील राहा आणि एकमेकांशी सख्य करून आपसातील कलह संपवून टाक. नवीन वर्षात सत्याची, श्रमाची, तेजाची कास धर. तू जसा नववर्षाच्या

स्वागतप्रसंगी प्रसन्न राहशील, तसा वर्षभर निरभ्र अंत:करणाने झळाळत राहा. -विठ्ठल जोशी (साभार)

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply