कर्जत : बातमीदार
तालुक्यात पाणीटंचाई सुरु झाली असून, सोमवारी (दि. 9) मोगऱज, पिंगळस या दोन गावांना आणि ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी या वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील मोग्रज, पिंगळस, धामणी, खांडस, पेठ, भूतीवली, खानंद, अंभेरपाडा, ओलमण, आंत्रट वरेडी, मोहोपाडा, चेवणे, ढाक, नांदगाव, तुंगी, अंतराट, नीड यांचा तर तालुक्यात आनंदवाडी, भगताचीवाडी, काठेवाडी, भल्याचीवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटरवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, मोरेवाडी, ताडवाडी, पाली धनगरवाडा, आसलवाडी, नाण्यांचा माळ, भूतीवलीवाडी, आसल धनगरवाडा, सागाचीवाडी, धामणदांड, बोरीचीवाडी-कळंब, काळेवाडी, मिरचुलवाडी, चिंचवाडी, अंथराटवाडी, बेलवाडी, आषाणे ठाकूरवाडी, नागेवाडी, भागूचीवाडी-1, भागूची वाडी-2, सावरगाव ठाकूरवाडी, हर्याचीवाडी, विकास वाडी, ठोंबरवाडी , गरुडपाडा, चिमटेवाडी, विठ्ठलवाडी, मेंगाळवाडी, तेलंगवाडी, कोतवालवाडी, कळकराई, बेकरेवाडी, माणगाव ठाकूर वाडी, स्टेशन ठाकूरवाडी, कोतवालवाडी, नवसुचीवाडी, जांभूळवाडी-वारे, खाड्याचापाडा, मधली वाडी, चाहुचीवाडी, मिरचोलवाडी, नारळेवाडी, भोमळवाडी, दामत कातकरीवाडी आणि नांदगाव विठ्ठलवाडी या 23 गावे व 56 आदिवासी वाड्यांना यंदा पाणीटंचाई भासेल असे गृहीत धरून डिसेंबर 2021मध्येे पाणीपुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ही पाणीटंचाई निवारण्यासाठी शासकीय टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्याची या आराखड्यात तरतूद आहे. त्यानुसार रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने कर्जत तालुक्यातील पाणीटंचाई निवारणासाठी दोन टँकर मंजूर केले आहेत. मोगरज, पिंगळस या दोन गावांत आणि ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी या वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी कर्जत तालुका पंचायत समितीकडे केली होती. त्यानुसार सोमवारपासून शासकीय टँकर सुरु केले आहेत. मोठ्या लोकवस्तीच्या मोगरज, पिंगळस या गावात रोज, तर ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी या वाड्यांत दिवसाआड टँकरद्वारे पाणी पोहचवले जाणार आहे. यापुढे मागणी आलेल्या सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरचे पाणी दिले जाईल, अशी माहिती कर्जतचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिली.
टँकरला जीपीआरएस? : टँकर कोणत्या भागात फिरत आहे याची माहिती मिळावी यासाठी शासनाने पाणी पोहचविणार्या टँँकर्सना जीपीआरएस यंत्रणा कार्यन्वित केली आहे. त्यामुळे पाणी घेऊन गेलेला टँकर कोणत्या भागात आहे याची माहिती मिळू शकणार आहे. आता कर्जतमध्येही ही यंत्रणा बसविली जाणार का हे लवकरच समजेल.
सोमवारपासून मोगरज, पिंगळस या गावात आणि ताडवाडी, मोरेवाडी, जांभूळवाडी, विठ्ठलवाडी या वाड्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यापुढे मागणी आलेल्या सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.
-चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पं. स.