पनवेल, ठाण्यात होणार नाट्यप्रयोग
पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाद्वारे इप्सित एंटरटेमेंट निर्मित आणि उदय फाऊंडेशन प्रकाशित गोदो वन्स अगेन या नाटकाची रंगभूमीवर धडाक्यात वाटचाल सुरू झाली असून, येत्या काळात विविध ठिकाणी प्रयोग होणार आहेत. विशेष म्हणजे 59व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाणे केंद्रातून या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले असून, त्याची अंतिम फेरीसाठी निवडदेखील झालेली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पनवेल शाखा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष सहकार्याने साकारलेल्या या नाटकाचा प्रयोग नुकताच माटुंगा (मुंबई) येथील यशवंत नाट्यमंदिरात झाला. त्यास रसिकप्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यानंतर 23, 25 व 26 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल मार्केट यार्ड येथे प्रयोग होणार असून, 29 डिसेंबरला दुपारी 4 वाजता ठाणे-नौपाड्यातील अभिनय कट्टा येथे प्रयोग होणार आहे. भगवान हिरे लिखित गोदो वन्स अगेन या नाटकाचे दिग्दर्शक वैभव अनंत महाडिक हे आहेत. नाटकाला संगीत कुणाल-करण यांनी दिले आहे, तर संगीत संयोजक राजेश (काका) परब आहेत. नेपथ्य सचिन गोताड, प्रकाश योजना दशरथ कीर, रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे. नाटकातील सर्व स्थानिक कलाकार कामोठे, खारघर, पनवेलचे असून, प्रवीण कुठार, अरुण पंडरकर, शेखर पगारे, नितीन पोचरिकर अशी त्यांची नावे आहेत. या नाट्यकृतीचे निर्मिती प्रमुख वैभव यादव, उदयराज तांगडी, तर सूत्रधार अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे व प्रभाकर वारसे आहेत.