Breaking News

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण ; ठेवीदारांच्या हक्काच्या पैशांसाठी शुक्रवारी रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन

पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न व पाठपुरावा सुरू आहे. त्या अनुषंगाने कर्नाळा बँक प्रशासन व पदाधिकार्‍यांना ठेवीदारांचे पैसे परत देण्याचे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने द्यावेत यासाठी शुक्रवारी (दि. 3) प्रसिद्ध सनदी लेखापाल माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील रिझर्व्ह बँकेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. या वेळी ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह समितीमधील पदाधिकारी, ठेवीदार या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
ठेवीदारांचे पैसे देण्यास कर्नाळा नागरी सहकारी बँक प्रशासन असमर्थ ठरल्याने ठेवीदार, खातेदार चिंतेत आहेत. त्यांना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी ठेवीदार संघर्ष समिती सक्रियपणे कार्यरत आहे, मात्र कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळ झोपेचे सोंग घेऊन बिनधास्त उत्तरांची टोलवाटोलवी करीत आहे. शेकडो ठेवीदारांनी आपल्या आयुष्याची पुंजी कर्नाळा बँकेत गुंतवली. त्यामुळे ठेवीदारांना आपल्या कुटुंबाच्या आयुष्याची चिंता वाटू लागली आहे. गोरगरिबांनी जमिनी विकून आपल्या आयुष्याची पुंजी स्थानिक बँक म्हणून कर्नाळा बँकेत जमा केली. परतावा म्हणून त्यांचे पैसे वेळेवर देणे क्रमप्राप्त होते, मात्र बॅँकेतीलच मंडळींनी घोटाळा करून सर्वसामान्य माणसाचा पैसा हडप केला. त्यामुळे ग्राहकांची अत्यंत बिकट व संकटकालीन परिस्थिती झाली आहे, मात्र बँक फसवी उत्तरे देऊन ठेवीदारांची
सातत्याने फसवणूक करीत आहे. दरम्यानच्या काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन 840 ठेवीदारांचे तक्रार अर्ज सादर केले व ठेवीदारांना त्यांचे पैसे परत देण्याचे निर्देश कर्नाळा बँकेला देण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे लवकरात लवकर ठेवीदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत यासाठी हे धरणे आंदोलन होणार आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply