Breaking News

राज्य सरकारचा महाराष्ट्रात तमाशा

चंद्रकांत पाटील यांचा घणाघातल

पुणे : प्रतिनिधी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यभर भाजपने आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. पुणे शहरातही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा सुरू असून, या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, परमबीर सिंहाच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर नितीमत्तेची थोडीशी का होईना; पण चाड शिल्लक असेल, तर त्यांनी अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा लगेच घेतला पाहिजे. परमबीर सिंहाच्या पत्रानंतर आता स्पष्ट झाले आहे की, राज्यातील ठाकरे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह जिथे सापडला, त्याच ठिकाणी काल आणखी एक मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे अतिशय खोलवर गेली आहेत. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटिलिया प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला नसता, तर हा विषय कधीच दाबला गेला असता. देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमकपणे हा विषय लावून धरल्यामुळे वाझेवर कारवाई होऊ शकली असेही पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, सचिन वाझेला तुम्ही सेवेत सामावून घेतल्यानंतर तो खंडणी वसूल करण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता. तर अनिल देशमुख सभागृहात कशाच्या आधारावर सचिन वाझेचा बचाव करत होते, याचं त्यांनी उत्तर द्यावं. कारण वाझेचं निलंबन तुम्हाला चालणार नव्हतं. आतातर यावर परमबीर सिंह यांनी देखील याबाबत कबुली दिली आहे. त्यामुळे अजून वाझे अजून बोलायचा आहे. एनआयएकडे आता याचा सगळा तपास वर्ग झालाय. त्यामुळे वाझे जर बोलू लागला, तर अनेक गोष्टी बाहेर येतील.

वाझे किती दिवस चूप बसणार?

परमबीर सिंग बोलले आहेत. अजून वाझे बोलायचे आहेत, वाझेही बोलतील. वाझे किती दिवस चूप बसणार? उद्धव ठाकरे आमचे जुने मित्र आहेत. राठोड प्रकरणावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचा राजीनामा घेतला. मग इतर प्रकरणावर ते गप्प का? सरकारचे पाय कुठे एकमेकांमध्ये अडकले आहेत? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

आघाडीचे सगळे एका माळेचे मणी

महाविकास आघाडीचे सगळे एका माळेचे मणी आहेत. ठाकरे सरकारला इशारा आहे, रोज नवी गोष्ट बाहेर येणार आहे. मी दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. त्यातील एक अनिल देशमुखांचा राजीनामा आज झाला पाहिजे. आणखी एक मंत्री जे गृह विभागात हस्तक्षेप करत होते. त्यांचाही तुम्हाला राजीनामा घ्यावा लागेल, मला नावे घ्यायला लावू नका, मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सगळं माहिती असतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply