Breaking News

चित्ररथाची चित्तरकथा

दर तीन ते चार वर्षांतून एकदा त्या-त्या राज्याला संचलनात स्थान दिले जाते. प्रत्येक राज्याला संधी मिळावी यासाठी राज्यांची आलटून पालटून निवड केली जाते. याच अलिखित संकेतामुळे महाराष्ट्राला यंदा चित्ररथ सादर करण्याची संधी मिळू शकली नाही. परंतु विरोधकांना यात देखील राजकीय सूडनाट्य दिसले ही महाराष्ट्राची शोचनीय चित्तरकथाच मानावी लागेल.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत होणार्‍या संचलनामध्ये राज्या-राज्यांचे चित्ररथ लक्ष वेधून घेतात. विविधतेतून एकता साधणार्‍या आपल्या विशाल भारत देशामध्ये कितीतरी परींच्या संस्कृती सुखेनैव नांदतात याचे प्रत्ययकारी प्रक्षेपण आपण घरोघरी टीव्हीवर पाहतो. त्या-त्या प्रांताची वेशभूषा, इतिहास, वर्तमानातील प्रगती अशा अनेक गोष्टींचे प्रतिबिंब या चित्ररथांमधून दिसते. किंबहुना, राजधानीतील विजय चौकात दरवर्षी प्रजासत्ताक दिनी भरलेले हे एक राष्ट्रीय सांस्कृतिक प्रदर्शनच असते असे म्हणावे लागेल. महाराष्ट्राचा चित्ररथ त्या चित्ररथांच्या रांगेत नेहमीच उठून दिसणारा असतो. हा चित्ररथ टीव्हीच्या पडद्यावर दिसू लागला की मराठी मन आनंदाने उचंबळून आल्याशिवाय राहात नाही. महाराष्ट्राने या चित्ररथांच्या स्पर्धेत आजवर किमान तीनदा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार पटकावला आहे. 1993, 94 आणि 95 अशा सलग तिन्ही वर्षी महाराष्ट्राचा चित्ररथ अव्वल ठरला होता. महाराष्ट्राच्या चित्ररथात मांडलेल्या संकल्पनांचे नेहमीच कौतुक होत असते. दोन वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा चित्ररथ महाराष्ट्राने सादर केला होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून साकार झालेला हा चित्ररथ आजही अनेकांच्या स्मरणात असेल. या चित्ररथाचे भारतभर कौतुक झाले होते. उत्तमोत्तम संकल्पनांसह चित्ररथ सादर करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय झाला आहे. तथापि यंदा मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये दिसणार नाही. राज्याच्या सांस्कृतिक खात्याने दिलेला प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाच्या विशेष समितीने नाकारला आहे. कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराला 350 वर्षे झाल्याची संकल्पना, महाराष्ट्राची वस्त्र परंपरा, महाराष्ट्रातील नाट्यपरंपरेची 175 वर्षे आणि गीतरामायण अशा चार संकल्पना संरक्षण मंत्रालयाच्या विशेष समितीला सादर करण्यात आल्या होत्या. मात्र हे सर्व प्रस्ताव नाकारण्यात आले. या मुद्द्यावरून आता राजकारण रंगू लागले आहे. यंदा राज्याच्या चित्ररथाला संचलनात स्थान न मिळाल्याने केंद्र सरकारने राजकारण केल्याची टीका शिवसेना आणि अन्य विरोधी पक्षांनी सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ या वेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत या मागे राजकीय षडयंत्र आहे काय, आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे काय, असे सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहेत. केंद्र सरकार राज्याला आकसापोटी सापत्न वागणूक देत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही केला आहे. कुठल्याही गोष्टीचे राजकीय भांडवल करून भारतीय जनता पक्षावर खापर फोडायचे असा एककलमी कार्यक्रम विरोधकांनी राबवला आहे. त्याचाच हाही एक भाग असावा. या प्रकरणात असे सहज दिसून येते की महाराष्ट्राला चित्ररथ नाकारण्यामध्ये कुठलेही राजकारण नसून केवळ संरक्षण विभागाची शिस्त व सर्वसमावेशक धोरण याला कारणीभूत आहे. दरवर्षी फक्त सोळा राज्यांच्याच चित्ररथांची निवड केली जाते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply