Breaking News

गजबजणारा रायगड जिल्हा वीकेण्डला सुना सुना!

वीकेण्ड लॉकडाऊनला कर्जतमध्ये प्रतिसाद

कर्जत : प्रतिनिधी

शनिवार आणि रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने एरव्ही कर्जत शहरातील गजबजलेले रस्ते शनिवारी (दि. 10) एकदम निर्मनुष्य दिसत होते. नेहमीच फेरीवाल्यांनी गराडा घातलेल रस्ते कमालीचे मोठे दिसत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय सर्व व्यवहार बंद होते.

कर्जत तालुक्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा उच्चांक झाला होता. तब्बल 81 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी सकाळी तालुक्यातील व्यवहार ठप्प झाले होते. व्यापार्‍यांनी वीकेण्ड लॉकडाऊनला आपली दुकाने बंद ठेऊन  पाठिंबा दिला. उद्या रविवारीसुद्धा अशीच परिस्थिती असणार आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने अनेक निर्बंध घातले होते. परंतु त्याला न जुमानता कर्जत शहरात दररोज मोठी गर्दी होत होती. कापड, हार्डवेअर, ज्वेलर्स दुकाने सोडता बहुतांश दुकाने उघडी हाती. काहींनी तर दुग्ध व्यवसायाचा परवाना नसतानासुद्धा दहा – बारा लिटर दुध विकण्यासाठी ठेऊन आपली अन्य वस्तू विक्रीची दुकाने बिनधास्तपणे उघडी ठेवली होती. लॉकडाऊनमुळे भाजी व्यवसायिक कमालीचे वाढले आहेत. तसेच रस्त्यावर चिकन, मटण,

मच्छीची दुकाने अनेकांनी थाटली आहेत. मात्र शनिवारी ती दुकानेसुद्धा बंद होती.

तालुक्यातील कडाव व कशेळे भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने तेथील व्यापारी वर्गाने तीन- चार दिवसांपूर्वी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार व रविवारीसुद्धा या भागातील दुकाने बंद असणार आहेत. शनिवारी  कर्जत बाजारपेठेत केवळ औषधे, दूध डेअरी ही दुकाने उघडी होती, त्यामुळे बहुतांश रस्ते निर्मनुष्य होते. उद्याही अशीच परिस्थिती असेल.

सुधागडातील बाजारपेठा पडल्या ओस

पाली : प्रतिनिधी

कोविड विषाणूंची साखळी तोडण्यासाठ राज सरकारने वीकेण्डला संपुर्ण लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे शनिवारी सुधागड तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेले पाली हे तालुक्याचे ठिकाणदेखील शांत व निर्मनुष्य दिसून आले. पाली, परळी व पेडली सारख्या एरव्ही गर्दीने फुलणार्‍या बाजारपेठांत सन्नाटा दिसून आला. वाकण-पाली-खोपोली, पाली-निजामपूर व अन्य रस्तेदेखील ओसाड पडले होते.

सुधागड तालुक्यातील एरव्ही गजबजलेल्या पाली, परळी व पेडली या बाजारपेठात शनिवारी जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेत मोडणार्‍या  दूध, औषधे घेण्यासाठीही  नागरिक हलक्या पावलांनी येत होते. पोलीस प्रत्येकाची कसून चौकशी करीत होते. 

 आदिवासी, छोटे व्यवसायिक व हातावर पोट असलेल्यांची शनिवार व रविवारच्या बाजारातील गर्दीवर   गुजराण होते, हे बंद असेच राहिले तर आम्ही खावे काय, अन जगावे कशी अशी व्यथा त्यांनी यानिमित्ताने मांडली. 

नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी जागोजाग कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे रस्त्यावर कोणतेही बिनकामी वाहन फिरताना दिसले नाही.  शासकीय, निमशासकीय कार्यालय बंद असल्याने पाली परिसरात शांतता पसरल्याचे दिसून आले.

मुरूमध्ये एसटीच्या फेर्‍या रद्द

मुरुड : प्रतिनिधी

वीकेण्ड लॉकडाऊनमुळे शनिवारी लोक बाहेर न पडल्यामुळे मुरूडमध्ये एसटीच्या फेर्‍या रद्द कराव्या लागल्या.

राज्य शासनाने वीकेण्ड लॉकडाऊनची अगोदरच घोषणा केल्यामुळे लोकांनी शुक्रवारी बाजारपेठेमध्ये गर्दी करून आवश्यक असणारा किराणा माल विकत घेतला होता. त्यामुळे शनिवारी शहर व ग्रामीण भागात शुकशुकाट दिसून आला. लोकांनी प्रवास करणे टाळले, त्यामुळे शनिवारी गाड्यांची संख्या कमी करण्यात आली होती.  मुंबई, पुण्याला जाणार्‍या गाड्या रद्द करण्यात आल्या.  फक्त शासकीय कर्मचार्‍यांसाठी अलिबागपर्यंतच  गाड्या सोडण्यात येत होत्या. मिनीडोर ऑटो रिक्षा व इतर वाहतूक बंद होती. शहरातील मासळी मार्केट, भाजी मार्केट, किराणा माल व सर्व प्रकारची दुकाने बंद होती.फक्त औषधांची दुकाने सुरु होती. एकही पर्यटक न फिरकल्याने समुद्रकिनारी गर्दी नव्हती. मुरुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पेणमध्ये शुकशुकाट

पेण : प्रतिनिधी

दोन दिवसांचा वीकेण्ड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असल्याने शनिवारी पेण शहर संपूर्णपणे बंद होते. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्णपणे बंद पाळला गेला.

आज एसटी सेवा काही प्रमाणात सुरू होती मात्र प्रवाशांची संख्या हाताची बोटावर मोजण्याइतकीच होती. पहाटे बाजार समितीमधील भाज्यांची दुकाने उघडण्यात आली होती. मात्र ग्राहकच नसल्याने व्यापार्‍यांचा हिरमोड झाला, यामुळे लवकरच दुकाने बंद करण्यात आली. मेडिकल, दवाखाने, तसेच अत्यावश्यक सेवा वगळता पेणमध्ये संपूर्ण लॉकडाऊन पाळला गेला.

नागोठणे संपूर्ण ’लॉक’

नागोठणे : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाकडून शनिवार आणि रविवार लॉकडाऊन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याला संपूर्ण नागोठणे शहरात पूर्णपणे सहकार्य करून दूध आणि औषधांची दुकाने वगळता कडकडीत बंद ठेवण्यात आला.

तीन तसेच सहा आसनी रिक्षा सुध्दा ठेवण्यात आल्या होत्या. कायम गजबजलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुध्दा वाहनेच नसल्याने महामार्ग पूर्णपणे मोकळा होता. येथील एसटी बसस्थानकावर दररोज किमान दोनशे एसटी बसेस येत असतात, मात्र पहाटेपासून दुपारपर्यंत एकही एसटी न आल्याने बसस्थानकात सुद्धा सामसूम होती. स्थानकात सेवेत असणारे वाहतूक नियंत्रक चंद्रकांत भोईर यांना विचारले असता, शुक्रवारी रात्रीच्या वस्तीवरील गाड्या संबंधित ठिकाणी गेल्याच नसल्याने सकाळी गाड्या आल्याच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, प्रवासी नसल्याने आज एसटी बसेस मूळ ठिकाणांतून सुटल्या नसल्याचे सांगितले.

प्रवासी असतील तर, आगारातून बस उपलब्ध होतील, परंतु लॉकडाऊनमुळे प्रवाशांनी घरातून बाहेर पडणे टाळले असल्याने रविवारी सुद्धा हीच परिस्थिती असेल असे ते म्हणाले.

माणगावमध्ये लॉकडाऊनला प्रतिसाद

माणगाव : प्रतिनिधी

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे वीकेण्ड लॉकडाऊला माणगावकरांनी प्रतिसाद दिला असून शनिवारी अत्यावश्यक सेवा असलेली दवाखाने व औषधांची दुकाने वगळता इतर सर्वच दुकानदारांनी 100 टक्के कडकडीत बंद पाळला.

माणगावात मुंबई-गोवा महामार्गावर या बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. बंदोबस्तासाठी शहरात फक्त पोलीस व स्वच्छतेसाठी नगरपंचातीचे सफाई कामगार दिसत होते. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यातही माणगावसह तालुक्यातील विविध गावांतील हजारो लोकांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये काहींना आपले जीव गमवावे लागले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही माणगावसह तालुक्यातील विविध गावांतून दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दररोज 50हून अधिक रुग्णांची कोरोनाची तपासणी होत असून दररोज येथे 15 ते 20च्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत. नगरपंचायत व पोलीस ठाणे यांच्यामार्फत नागरिकांना मास्कचे वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, गर्दी करू नका असे मार्गदर्शन वेळोवेळी केले जात आहे. दरम्यान, कोणीही घाबरून न जाता शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा, तसेच 45 वर्षांवरील वयोगटाच्या नागरिकांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोविड लस घ्यावी, असे आवाहन माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply