संभाजीराजे उद्या घेणार भेट
मुंबई ः प्रतिनिधी
मराठा आरक्षणावर कोल्हापुरात खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्वात बुधवारी (दि. 16) मूक आंदोलन झाले. या वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या आंदोलनानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या आंदोलनात मराठा समर्थकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंनी आंदोलनानंतर बोलताना शुक्रवारी मुंबईत मराठा समन्वयकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले, मात्र या वेळी त्यांनी पुढील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
संभाजीराजे म्हणाले की, चर्चेला गेलो याचा अर्थ आम्ही समाधानी झालो असा नाही. ती चर्चा होणार आणि त्यातून काय निष्पन्न होणार हे आम्ही पाहणार. चेतावणी द्यायची नाही, पण ठरलेले मोर्चे नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगड येथे होणारच आहेत.