Breaking News

आंबेनळी घाटरस्त्यातील खड्डे ठरताहेत जीवघेणे

पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटापर्यंतचा पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित आहे. 2004 ते 2009 यादरम्यान पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग स्वतंत्रपणे कार्यभार पाहू लागला. त्या वेळी पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर या राज्यमार्गापैकी 22 किलोमीटर अंतराचा रस्ता या उपविभागाकडे सोपविण्यात आला. सुरवातीला राज्य सरकारच्या अखत्यारीतील रस्ते उपविभागाने करायचे आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्ते झेडपीच्या बांधकाम विभागाने करायचे असा एक प्रघात पडलेला दिसून आला.

2008च्या आमसभेमध्ये तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांनी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडे कामच नसल्याचे म्हटल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने झेडपी बांधकाम विभागाकडे करायचे झाले तर काम भरपूर आहे मात्र पैसाच नाही ही वस्तुस्थिती मांडून पोलादपूर तालुक्यातील केवळ आंबेनळी घाटाकडे जाणारा महाबळेश्वर-वाई-सुरूर रस्ता उपविभागाकडे असून उपयोगाचे नाही तर काटेतळी करंजाडी रस्ता, पोलादपूर पैठण कुडपण रस्ता, पोलादपूर कोतवाल रस्ता, पोलादपूर ओंबळी रस्ता, भोराव ते हावरे रस्ता तसेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी निश्चित करण्यात आलेला कापडे ते कामथे रस्ता यांचा समावेश करण्याची मागणी केली होती. यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सदस्यांनी या प्रस्तावावर जोरदार हरकत घेऊन जिल्हा परिषदेचे रस्ते पोलादपूर बांधकाम उपविभागाकडे वर्ग करण्यास आक्षेप नोंदविला, मात्र आमसभेचे अध्यक्ष असलेले तत्कालीन आमदार जगताप यांनी पोलादपूर बांधकाम उपविभाग टिकविण्यासाठी काही रस्त्यांच्या काही किलोमीटर दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी या बांधकाम उपविभाग आवर सोपविली, पण पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अस्तित्वात आल्यापासून असलेली पोलादपूर महाबळेश्वर-वाई-सुरूर रस्त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी या सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून अक्षम या हलगर्जीपणा दाखवण्यात आल्याने आजतागायत या रस्त्यावर असंख्य मृत्यू हकनाक झाले आहेत.

आंबेनळी घाटातील दापोली कृषी विद्यापिठाच्या कर्मचार्‍यांच्या बसचा भीषण जीवघेणा अपघात झाल्यानंतर या पोलादपूर- महाबळेश्वर-वाई-सुरूर रस्त्यांची दुरूस्ती करण्यासाठी या सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून प्रयत्न सुरू झाले, मात्र या प्रयत्नांना झारीतील शुक्राचार्यांच्या अडेलतट्टू धोरणांमुळे खीळ बसल्यानंतर काही राजकीय ठेकेदारांसह प्रेतांच्याही टाळूवरचे लोणी खाणारे समाजमाध्यम प्रतिनिधी सोकावले. यातून हा आंबेनळी घाट सुरक्षित असल्याच्या कपोलकल्पित कहाण्या बोहल्यावर चढण्यापूर्वी प्रसिध्द करून संबंधित ठेकेदाराकडून लग्ननिधी संकलनही केले गेले, मात्र या सगळयाला सुर्यग्रहणाच्या दिवशीच ग्रहण लागले. सकाळी पडलेल्या रिपरिप पावसानंतर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रामचंद्र दत्तात्रय कदम हे पुणे येथे हे त्यांच्या दुचाकीवरून महाबळेश्वर मार्गाने जात असताना पायटे गावाजवळील तीव्र वळण उतारावर पोलादपूरच्या दिशेने येणार्‍या भरधाव टेम्पोने  त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या वेळी घाटरस्त्यामध्ये पाऊस पडत असल्याने धुकेही पसरले होते.

पोलादपूर आणि कापडे गावांच्या दरम्यान महाबळेश्वर रस्त्यावर अनेक खड्डे असून हे खड्डे बुजवण्यासाठी रस्त्याच्या साईडपट्टीवर आणि दगडी भुकटी ठेवण्यात आली आहे. पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीमध्ये हा रस्ता आहे. मात्र, या उपविभागाच्या अभियंत्यांनी खड्डयात कडे दुर्लक्ष केले आहे. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या खड्ड्यांवरून दावी मोटारसायकल दगडी भुकटी आणि खडी वरून घसरली आणि समोरून येणार्‍या अक्कलकोट ते महाड एसटी बसखाली मोटरसायकलवरील दोघांचेही डोके येऊन भीषण अपघात झाला. खडीवरून घसरल्याने मोटरसायकलवरील अरुण अशोक गोळे (रा. चांभारगणी) आणि संदीप नाना ढेबे (तुटवली, ता. पोलादपूर) दोघे तरुण जागीच ठार झाले. अपघाताच्या या घटनेनंतर कापडे परिसरामध्ये महाबळेश्वर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप पसरला असून ग्रामस्थ आणि समाजसेवकांनी याबाबत संबंधित अभियंत्यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यात येऊन ठेवणार याबाबत खुलासा करण्याची मागणी सहाय्यक निरीक्षक जाधव यांच्याकडे केली. या वेळी सर्वपक्षीय राजकीय पुढारी, ग्रामस्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये उपस्थित होते.

अनेकांनी या वेळी पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या आवारात आणून ठेवण्याची भूमिका संतप्तपणे घेतली. यावरूनच पोलादपूर ते महाबळेश्वर आंबेनळी घाटरस्त्यावरील खड्डे किती जीवघेणे ठरत आहेत. याची प्रकर्षाने कल्पना येऊ शकत असताना दोन दिवसांनंतर सर्वकाही शांत झाले असताना पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंते आजमितीस कोणतीही तत्परता या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकामी दाखवत नसल्याने अजून किती बळी घेतल्यानंतर या सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांना जाग येणार आहे, असा सवाल पोलादपूरवासीय करीत आहेत.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply