Breaking News

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चार दिवसांत आठ अपघात

खोपोली : प्रतिनिधी – कोरोनाचे महाभयानक संकट, त्यादृष्टीने असलेला देशव्यापी लॉकडाऊन काळातही मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वरील वाहनांची गर्दी कमी नाही. येथे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. अपघातांची मालिकाच थांबता थांबत नसल्याने मदत कार्यात व जखमींवर  उपचारासाठी ही अडचणी निर्माण होत आहेत. रविवारपासून ते बुधवारपर्यंत चार दिवस एक्सप्रेस वे वर दररोज मल्टिपल अपघात घडत असल्याने यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो आहे.

रविवारच्या अपघात एकाचा बळी, त्यानंतर सोमवारी कंटेनरने तीन वाहनांना धडक देऊन झालेल्या अपघातात तीन बळी तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी ही सकाळी एक्सप्रेस वे वर दोन अपघात घडले. यात एक्सप्रेस वे वर बंदी असूनही, दुचाकीने मुंबई ते पुणे असा प्रवासासाठी निघालेल्या दुचाकीचा अपघात घडला. या विचित्र अपघात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारची सकाळ ही अपघातांच्या मालिकेने उजाळली. बुधवारी सकाळी एक्सप्रेस वे वर खालापूर टोल नाका ते बोरघाट पोलीस नियंत्रण कक्ष पर्यंतच्या सात किमी अंतरात वेगवेगळ्या वाहनात तीन ठिकाणी विचित्र अपघात घडले. यात एकाचा मृत्यू तर एकूण पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

मागील चार दिवसांत लागोपाठ घडत असलेल्या अपघातांच्या घटनांमुळे आयआरबी मदत टीम, एक्सप्रेस वे वरील डेल्टा फोर्सचे जवान, महामार्ग वाहतूक नियंत्रण पोलीस यंत्रणा व मदत कार्य करणार्‍या खोपोली अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय ग्रुपवर प्रचंड ताण पडला. अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमावली व नियंत्रण बाबत कडक अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply