Breaking News

नवे वर्ष,नव्या मालिका, नवी आव्हाने आणि नव्या संधी!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका अपेक्षेप्रमाणे जिंकून नव्या वर्षात विजयी सलामी दिली. घसरणीला लागलेल्या लंकेला लीलया मात देणार्‍या टीम इंडियाचे विमान ऑस्ट्रेलियाने मात्र जमिनीवर आणले. उभय संघांमध्ये खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑसी खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करीत भारताला सर्व पातळ्यांवर निष्प्रभ ठरविले. मग ‘करो या मरो’च्या दुसर्‍या सामन्यात यजमानांनी सांघिक खेळाद्वारे शानदार विजय मिळवत मालिकेत जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे आता तिसरा व अंतिम सामना निर्णायक ठरेल. भारतीय संघ यंदा आपल्या भरगच्च वेळापत्रकात टी-20, वन डे आणि कसोटी अशा तिन्ही प्रकारांतील अनेक मालिका खेळणार आहे. ‘कांगारूं’विरुद्ध दोन हात केल्यानंतर ‘किवीं’चा सामना ‘विराटसेने’ला करायचा आहे. यावर्षीचा भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा असून, यानिमित्ताने नवोदित खेळाडूंपुढे आव्हान आणि संधी दोन्ही आहे.

टीम इंडियाने गतवर्षाच्या अखेरीस वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिका जिंकली. किएरॉन पोलॉर्ड व सहकार्‍यांनी भारतीय संघाला झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण मोक्याच्या वेळी यजमान पाहुण्यांवर भारी पडले आणि तिथेच कल स्पष्ट झाला. विंडीजची एक खास बाब दखल घेण्याजोगी आहे ती म्हणजे त्यांची खिलाडू वृत्ती. हे खेळाडू खेळाचा मनमुराद आनंद लुटतात. जिंकल्यावर नृत्य करून जल्लोष करतात आणि हरल्यावर निराश-हताश होत नाहीत, तर प्रतिस्पर्ध्याला सन्मान देतात. त्यांचे कौतुक करतात. कॅरेबियन बेटावरील लोक मुळातच

मौजमस्ती करून जीवन जगणारे आहेत. त्यांच्या या जीवनशैलीचे प्रतिबिंब खेळाच्या मैदानातही दिसून येते. आर्थिक चणचण आणि मंडळासोबतचा वाद यातून हा संघ हळूहळू सावरत आहे. त्यांचे असणे जागतिक क्रिकेटसाठीही आवश्यक आहे.

गेल्या वर्षी विश्वचषकाचा दुष्काळ संपवून इंग्लंडने ऐतिहासिक कामगिरी साकारली. त्यांच्या तोडीस तोड खेळ करून न्यूझीलंडनेही क्रिकेटरसिकांची मने जिंकली. वर्ल्ड कपची फायनल कोण विसरेल? मुख्य लढत आणि सुपर ओव्हरही टाय झाल्यानंतर केवळ चौकार जास्त असल्याने इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही संघांमध्ये विजयाचे तितके सातत्य दिसून येत नाही. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघ ढासळत चालला आहे. प्रमुख खेळाडूंच्या निवृत्तीनंतर युवा खेळाडूंचा उदय होणे अपेक्षित असताना ते घडत नाही. त्या तुलनेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानने आपली जागा कायम ठेवली असून, नव्या खेळाडूंचे प्रदर्शन वाखाणण्याजोगे आहे. क्रिकेटविश्वात सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ तगडे मानले जातात आणि याच संघांमध्ये जगात सर्वश्रेष्ठ कोण या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी वन डे मालिका होत आहे. उभय संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने उत्कंठा अधिकच ताणली गेली आहे.

चेंडू कुरतडण्याच्या (बॉल टेम्परिंग) प्रकरणावरून ऑस्ट्रेलिया संघाची झालेली नाचक्की आणि तीन खेळाडूंचे निलंबन धक्कादायक होते. या तिघांमध्ये गोलंदाज कॅमेरॉन बँक्रॉफ्टसह तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर हेही दोषी असल्याचे समोर आले. निलंबनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत स्मिथ ढसाढसा रडला होता. वॉर्नरदेखील हतबल झाला होता. हीच स्मिथ-वॉर्नर जोडी वर्षभर मैदानापासून दूर राहून परतल्यानंतर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. त्यातही 33 वर्षीय वॉर्नरची तंदुरुस्ती आणि खेळ दोन्हीही पाहण्यासारखे आहे. कर्णधार अरॉन फिंच, मार्नस लाबूशेन हेही चांगली फलंदाजी करण्यात वाकब्गार आहेत. गोलंदाजीत मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाचे प्रमुख वेगवान अस्त्र आहे, तर फिरकीपटू अ‍ॅडम झम्पालाही गडी बाद करण्यात यश येत आहे. अन्य खेळाडूंना आपली उपयुक्तता सिद्ध करणे अद्याप

बाकी आहे.

भारतीय संघाचा विचार करता समतोलपणा आढळतो. फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली हे मोठमोठे विक्रम नावावर असणारे दिग्गज आहेत. जर ऑस्ट्रेलियाकडे डेव्हिड वॉर्नर आहे, तर भारताकडे शिखर धवन आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. वॉर्नरहूनही एका वर्षाने धवन मोठा आहे. भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग जसा कोणत्याही मैदानावर, कोणत्याही गोलंदाजाचा यथेच्छ समाचार घेत असे, तशाच प्रकारे धवनलाही आपण कुठे वा कोणाविरोधात खेळतोय याचा फरक पडत नाही. युवा खेळाडूंनी त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. आणखी एका खेळाडूने सर्वांना प्रभावित केले आहे तो म्हणजे के. एल. राहुल. त्याला पाहून ‘मि. डिपेंडेबल’ राहुल द्रविडची आठवण येते. द्रविड ज्याप्रमाणे आवश्यकतेनुसार कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करीत असे, त्याचप्रमाणे हा नवा राहुलही सलामी असो की मधली फळी आपले योगदान देत आहे. फलंदाजीबरोबरच तो आता ऋषभ पंतच्या जागी सफाईदार यष्टीरक्षण करीत आहे. या दोन राहुलमधील हा आणखी एक योगायोग. अशा दुहेरी जबाबदारीमुळे अतिरिक्त खेळाडू खेळविता येऊ शकतो. दुसरीकडे पंतसह श्रेयस अय्यरने पुरती निराशा केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध चमक दाखविणार्‍या अय्यरने तुल्यबळ ऑस्ट्रेलिया संघाशी झुंज देताना खेळ उंचावणे आवश्यक आहे. मनीष पांडेनेही प्रगल्भता दाखविणे त्याच्यासह संघासाठी हितकारक ठरेल. गोलंदाजीत भारताने केलेले ‘कमबॅक’ महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या सामन्यात ऑसी सलामीवीर जोडीने भारतीय गोलंदाजीच्या मर्यादा दीर्घकाळानंतर उघड केल्या होत्या. क्षेत्ररक्षणही साजेसे झाले नव्हते. पुढच्याच सामन्यात भारतीय वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी चुका सुधारून नियंत्रित मारा केला. मोहम्मद शमी महागडा ठरला, पण त्याने तीन गडी बाद केले. रवींद्र जडेजा, कुलदीप यादवसोबत नवोदित नवदीप सैनीनेही ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडण्यात मोलाची भूमिका बजावली. मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराम चांगल्या लयीत दिसला. शार्दुल ठाकूरने गोलंदाजी व फलंदाजी दोन्हीत चुणूक दाखवून दिली आहे. त्याला अधिकाधिक सामने खेळायला मिळाले पाहिजेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन सामन्यांमध्ये बरोबरी झाल्यानंतर तिसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्यासाठी उभय संघ उत्सुक आहेत. दोघांनाही समान संधी आहे. निर्णायक सामन्यात जो अधिक चांगला खेळेल तोच जिंकेल हे नव्याने सांगायला नको. 

आताशी कुठे दोन मालिका संपत आल्या आहेत. ‘विराटसेने’ला चालू वर्षात अनेक सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपल्यानंतर टीम इंडियाला न्यूझीलंडचा जम्बो दौरा करायचा आहे. यात पाच टी 20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांचा समावेश आहे. भारतीय उपखंडाबाहेरील हा दौरा उदयोन्मुख खेळाडूंचा कस पाहणारा असेल. त्याच वेळी परदेशात चमकणे संघातील स्थान मजबूत करण्यास बळकटी देईल. मग दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येणार आहे. पुढे आयपीएलचे 13वे पर्व रंगेल. त्यानंतरही वेगवेगळ्या संघांसोबत खेळायचे आहे. याच वर्षी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे. सामने, मालिका यांची आवर्तने सुरूच राहणार आहेत. अशा वेळी आवश्यक आहे तो फिटनेस. चांगले प्रदर्शन करायचे असेल, तर तंदुरुस्ती राखण्याशिवाय पर्याय नाही.

बीसीसीआयकडून धोनीला अलविदा?

जगातील सर्वांत श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने वार्षिक करार जाहीर केले आहेत. त्यानुसार अ+, अ, ब आणि क अशा चार श्रेणींमध्ये खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे, मात्र या करारातून टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार राहिलेल्या महेंद्रसिंह धोनीला वगळण्यात आले आहे. याबाबत धोनीला पूर्वकल्पना दिल्याचे बीसीसीआयने स्पष्टकेले आहे, मात्र यावर धोनीची प्रतिक्रिया आलेली नाही. गेले अनेक दिवस तो मैदानापासून लांब आहे. त्यामुळे त्याला वार्षिक करारमुक्त करून बीसीसीआयने त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे. याखेरिज न डमगमता वेळोवेळी झुंजारपणे लढणार्‍या हार्दिक पांड्याला ‘अ’ श्रेणीतून ‘ब’ श्रेणीत ढकलून फॉर्मशी झगडणार्‍या ऋषभ पंतचा ‘ब’मधून ‘अ’ श्रेणीत समावेश करणे न पटण्यासारखे आहे. ‘आले बीसीसीआयच्या मना तेथे कोणाचे चालेना’ दुसरे काय!

-समाधान पाटील

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply