पारितोषिक वितरण; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शब्दांना सुख दुःख नसते. त्यामुळे शब्दांचे विचार महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मुंबई येथे केले. जीवनात पद राहत नाही, तर जीवनातील पत महत्त्वाची असते आणि माणुसकीची पत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राखली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 21 आणि 22व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि. 3) मुंबईत झाला. त्या वेळी गुजराथी बोलत होते.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, विश्वस्त तथा दै. रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, कार्यवाह संदीप चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, शैलेंद्र शिर्के, अर्थतज्ज्ञ जे. डी. तांडेल, जगदीश भौड यांच्यासह महाराष्ट्रातील साहित्यिक, लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कृतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वांत मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्यामुळे दिवाळी अंकांच्या 112 वर्षांच्या परंपरेत खंड पडला नाही. सन 2021च्या अर्थात 21व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत नाशिक येथील अंकुर काळे यांच्या ’दुर्ग’ अंकाने प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे येथील डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या ’संवाद सेतू’ आणि पुणे येथील हेमंत पोतदार यांच्या ’व्यासपीठ’ अंकाने द्वितीय (विभागून), तर तृतीय क्रमांक (विभागून) जळगाव येथील नामदेव कोळी यांच्या ’वाघूर’ आणि सोलापूर येथील इंद्रजित घुले यांच्या ’शब्दविचार’ अंकाने मिळविला. उत्कृष्ट कथेचे बक्षीस ’अक्षरधारा’ दिवाळी अंकातील ’देव करो’ या कथेने, उत्कृष्ट कविता ’शब्दरूची’ अंकातील सदानंद डबीर यांनी, उत्कृष्ट व्यंगचित्र गजानन घोंगडे यांनी, उत्कृष्ट विशेषांक दिनकर शिलेदार यांच्या ’मी’ अंकाने तर उत्कृष्ट मुखपृष्ठाचे बक्षीस रामनाथ आंबेरकर यांच्या ’किल्ला’ या अंकाने पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रतिभा सराफ, रविप्रकाश कुलकर्णी, अरविंद दोंदे, श्रीकांत नाईक या साहित्यिक मंडळींनी काम पहिले.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत शारदा धुळप यांच्या ’साहित्यआभा’ अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला. द्वितीय क्रमांक प्रमोद वालेकर यांच्या ’दैनिक किल्ले रायगड’ अंकाने, तृतीय क्रमांक शुभदा पोटले यांच्या ’म्हसळा टाइम्स’ अंकाने, तर उत्तेजनार्थ बक्षिस रत्नाकर पाटील यांच्या श्री समर्थ विचार आणि नाना करंजुले यांच्या कर्तृत्व अंकाने पटकाविले.
सन 2022च्या अर्थात 22व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ’दीपावली’ अंकाने प्रथम क्रमांक पटकावित सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक होण्याचा सन्मान मिळविला. ’पद्मगंधा’ अंकाने द्वितीय, तर ’दै. उद्याचा मराठवाडा मुक्तपर्व’ अंकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्वोत्कृष्ट विशेषांक होण्याचा मान ’सकाळ स्वराभिषेक’ अंकाने, सर्वोत्कृष्ट बालसाहित्य अंक ’वयम’, उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून ’ आंतरभारती’, उत्कृष्ट कथेचे बक्षीस ‘अक्षर’ दिवाळी अंकातील ’काम तमाम वाघा बॉर्डर’ या लेखक सतीश तांबे यांच्या कथेने, उत्कृष्ट कविता ’वाघूर’ दिवाळी अंकातील कवी विनय पाटील यांच्या ‘एक थोराड झाड’ या कवितेने, उत्कृष्ट मुखपृष्ठ ’उत्तम अनुवाद’ दिवाळी अंकाने तसेच उत्कृष्ट व्यंगचित्र ’मार्मिक’ अंकातील गौरव सर्जेराव यांच्या व्यंगचित्राने पटकाविले. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेख ‘कालनिर्णय’ दिवाळी अंकातील निळू दामले यांच्या ‘विल्यम शॉन’ या लेखाने, लक्षवेधी परिसंवाद ‘अंतरीचे प्रतिबिंब’ दिवाळी अंकातील ‘अक्षय ऊर्जा’ने, लक्षवेधी मुलाखत म्हणून दिलीप माजगावकर, संवादक दिलीप प्रभावळकर-शब्दमल्हार दिवाळी अंकाने पटकाविले.
राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विजय तपास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव व कवियत्री, चित्रकार मिनाक्षी पाटील, सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी बजावली.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ’साहित्यआभा’ अंकाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक ’दैनिक किल्ले रायगड’ अंकाने, तृतीय क्रमांक ’आगरी दर्पण’ अंकाने, तर उत्तेजनार्थ बक्षीस ’साप्ताहिक माणगंगा’ आणि ’साप्ताहिक कोकणनामा’ अंकाने पटकाविले असून उत्कृष्ट कथा ’दि म्हसळा टाइम्स’मधील सु. पुं. अढाऊकर यांच्या ‘खारे बिस्कुट’ कथेने, उत्कृष्ट कविता ‘सा. कोकणनामा’ मधील मनश्री उल्हास पवार यांच्या ‘आई-बाबा’ कवितेने, तर उत्कृष्ट व्यंगचित्र साहित्य आभा अंकातील व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या व्यंगचित्राने पटकाविले. या सोहळ्यात शतकोत्सव साजरा करणार्या ’मौज’ दिवाळी अंकाचा विशेष सन्मान करण्यात आला.