Breaking News

सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास!

’हुं खातो नथी अने खावा देतो नथी,’ (मी खात नाही आणि कुणाला खाऊ देत नाही) असे ठणकावून सांगत नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी 26 मे 2014 रोजी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. संसद भवनाच्या पायर्‍यांवर माथा टेकला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना प्रणाम करून या देशाचा पंतप्रधान नव्हे; तर प्रधानसेवक म्हणून कामाला सुरुवात केली. झपाटल्यासारखे कार्य करताना देशाला जागतिक स्तरावर एक जबरदस्त प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. शेजारी राष्ट्रांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठीसुद्धा मागेपुढे पाहिले नाही. महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा सपाटाच लावला.

भारतीय जनता पक्षाच्या संघटन मजबुतीसाठी आपले विश्वासू सहकारी अमित शहा यांच्या मदतीने राजनाथ सिंह, नितीन गडकरी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, जगत्प्रकाश नड्डा आणि अन्य सहकार्‍यांच्या सहयोगाने देशात योग्य ती पावले टाकण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. हा हा म्हणता 2019 साल उजाडले आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 2014च्या तुलनेने दोन पावले पुढे जात आणखी घवघवीत यश पटकावले. लोकसभेच्या 543पैकी भारतीय जनता पक्षाच्या 282वरून 303 जागा झाल्या. हातात प्रचंड आणि सुस्पष्ट बहुमत असतानाही राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणूनच सत्ता स्थापन केली. मित्रपक्षांना सोबत घेऊन राज्यशकट हाकण्यासाठी वाटचाल न थकता, न दमता दिवसाचे 18-18 तास काम करून सत्तरीच्या जवळ पोहचतानाही तरुणांना लाजवेल असा अफाट उत्साह नरेंद्र मोदी यांनी देशाला नव्हे; तर अवघ्या विश्वाला दाखवून दिला.

अयोध्येत प्रभू श्रीराम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागला. घटनेच्या 370 कलमाच्या संदर्भातसुद्धा 70 वर्षांत जो होऊ शकला नव्हता तो धाडसी निर्णय अमित शहा यांनी लीलया मार्गी लावताना जम्मू- काश्मीर आणि लडाख यांच्या अस्मितेचा प्रश्न सोडवला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. आता आणखी धाडसी निर्णय घेण्यात येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांना समाजात एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही श्रद्धास्थाने मानणारा समाज आहे, वर्ग आहे. या प्रत्येक श्रद्धास्थानाची जपणूक करताना, त्यांच्याबद्दलच्या भावना जपताना, दुसर्‍यांच्या भावना दुखावणार नाहीत, दुसर्‍यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही, तडा जाणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सब का साथ, सब का विकास याबरोबरच आता सब का विश्वास हे आपल्या आधीच्या सूत्रात जोडले आहे. त्यांना साथ देत सहकार्य, समन्वय, सौहार्द आणि सामंजस्याने हातात हात घालून पुढे जाऊ या. -योगेश त्रिवेदी

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply