नगरपंचायत कारवाईच्या इशार्याला भंगारवाला जुमानेना
खालापूर : प्रतिनिधी
येथील मुख्य रस्त्यालगत एक भंगारवाला वापरत असलेल्या जागेवर बाहेरून आणलेले प्लास्टिक टाकण्यात येत असून, या ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा डोंगर उभा राहिला आहे. त्याबाबत कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे. या इशार्याला भंगार व्यावसायिकाने कचर्याची टोपली दाखविली आहे.
खालापूर शहरातील स्वामी विवेकानंद विद्यालय आणि इंग्लीश शाळेच्या मध्यवर्ती भागात रस्त्यालगत एका भंगार व्यावसायिकाने जागा घेतली आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून परगावातून टेम्पोमधून आणलेला विविध प्रकारचा कचरा टाकण्यात येत आहे. त्यात बंदी असलेले प्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या ठिकाणी बंदी असलेल्या प्लास्टिकचा डोंगर उभा राहिल आहे. नवी मुंबईची पासिंग असलेल्या टेम्पोतून या ठिकाणी कचरा आणला जात असल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपंचायतीने या भंगार व्यावसायिकाला बोलावून कचरा तातडीने हटविण्यास सांगितले होते. तसेच पुढे नगरपंचायत हद्दीत प्लास्टिक कचरा आणू नये, अशा सूचना मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी केल्या होत्या. त्याला आठ दिवस उलटून सुद्धा प्लास्टिक कचरा हटविण्यात आला नसून, उलट तेथील प्लास्टिक कचर्याचा ढिग वाढतच आहे.
दिवस मावळताना येथे टेम्पो येत असून, त्यातील कचरा दिवस उजाडण्या आधीच खाली केला जातो. बंदी असलेल्या प्लास्टीकचा या ठिकाण डोंगर झाला आहे. प्लास्टिकच्या पिसव्या वापरणार्या सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई केली जाते, मग प्लास्टिकचा डोंगर उभारणार्या भंगार व्यावसायिकाला झुकते माप का, दिले जात आहे.
-दिपक जगताप, सामाजिक कार्यकर्ता, खालापूर