कर्जत बार्णे येथे शेतकरी-शास्त्रज्ञ मंचची बैठक उत्साहात

कर्जत : प्रतिनिधी
फायदेशीर शेतीसाठी भातानंतर भातऐवजी भात -भाजीपाला, भात-कडधान्य अशी पीक पद्धती अवलंबण्याची व त्यास कृषिपूरक उद्योगाची जोड देण्याची गरज आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी तसेच शाश्वत शेतीसाठी एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब आवश्यक आहे, असे प्रतिपादन कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांनी केले. कर्जत तालुक्याच्या शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची बैठक बार्णे येथील प्रगतशील शेतकरी दशरथ मुने यांच्या शेतावर पार पडली. या बैठकीत डॉ. एस. बी. भगत उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ व शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे समन्वयक डॉ. रवींद्र मर्दाने यांनी, विद्यापीठाच्या विविध भात जातीची माहिती दिली. तसेच ग्राम बीजोत्पादन, एक गाव-एक वाण, गटशेती व यांत्रिकीकरण यांचे महत्त्व पटवून देत मंचाच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन विद्यापीठाचे नवतंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी अन्य शेतकर्यांनाही प्रवृत्त करावे, असे आवाहन केले. डॉ. नामदेव म्हसकर यांनी कंद पिकाची माहिती दिली. या वेळी शेतकर्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यात जाड दाण्याचे नवीन भात वाण विद्यापीठाने संशोधित करावे, छोट्या यांत्रिक कृषी अवजारांची निर्मिती करावी, भात खरेदी केंद्र दिवाळीच्या वेळेस सुरू व्हावे, उन्हाळी भाताचीसुद्धा शासनाने खरेदी करावी, ड्रम सीडरला अनुदान मिळावे, पशू वैद्यकीय रुग्णालयातून विविध औषधे उपलब्ध व्हावीत, व डॉक्टरांच्या सेवा मोफत मिळाव्यात आदि मागण्या शेतकर्यांनी केल्या. या बैठकीत झालेल्या चर्चेत शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष वि. रा. देशमुख, ह.भ.प. भरत महाराज देशमुख, विनायक गोगटे, अशोक पाटील, निलिकेश दळवी, रवींद्र देशमुख, जगदीश पाटील, मनोहर कदम, अण्णा पवार, रमण पाटील, बजरंग श्रीखंडे आदींनी भाग घेतला. या सभेला शास्त्रज्ञांसह 34 शेतकरी उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन डॉ रवींद्र मर्दाने यांनी केले होते.