मुरूड, श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यात जंजिरा नवाबांची सत्ता होती. या भागाला जंजिरा संस्थान म्हणून संबोधले जायचेे. 31 जानेवारी 1948 रोजी जंजिर्याच्या नवाबाने भारताच्या सामिलनाम्यावर सही केल्याने हे जंजिरा संस्थान भारतात विलीन झाले होते. तेव्हापासून हा दिवस हा जंजिरा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यासाठी रायगड प्रेस क्लब व मुरूड तालुका पत्रकार संघाच्या वतीने आझाद चौकात नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, परंतु जंजिरा संस्थान भारतात 31 जानेवारी 1948 रोजी सामिल झाल्याने हा दिवस शासकीय इतमामात साजरा होण्यासाठी रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाचे मोठे प्रयत्न शासन पातळीवर सुरू आहेत. ज्याप्रमाणे मराठवाडा स्वतंत्र दिन साजरा केला जातो त्याच धर्तीवर जंजिरा मुक्तीसंग्राम दिन साजरा व्हावा अशी इच्छा या दोन्ही संघटनांची आहे. यासाठी शासन पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत या दोन पत्रकार संघटना जंजिरा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याचा त्यांचा मनोदय आहे. यंदाही या दोन पत्रकार संघटनांकडून जंजिरा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर सिद्धी अहमद खान हे जंजिर्याचे नवाब असून, त्यांचा कालावधी 1883 ते 1922 असा राहिला. प्रजा हितदक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती राहिली आहे. मुरूड शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी गारंबी धरणाची निर्मिती, शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी फातिमा बेगम हॉस्पिटल निर्माण करण्यात आले. 1888 साली मुरुड नगर परिषदेची स्थापना नवाबांनीच केली आहे. तहसील कार्यालय पंचायत समिती सर्व सरकारी कार्यालये एकाच जागेत व एकाच रेषेत निर्माण करून लोकांना चांगली सुविधा मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. लोकाभिमुख सरकार चालवणार्या या राजाच्या कार्यपद्धती व प्रशासन पद्धत याबाबत जास्तीत जास्त माहिती सांगण्यात येऊन त्यांचे जीवनचरित्र लोकांना माहित होण्यासाठी हा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
मुरूडला आधुनिक सुधारणांची महर्तमेढ सर सिद्धी अहमद खान या नवाब राजांनी करून दिली. 1892 रोजी गारंबी धरण बांधले. 1882 मुरुड सार्वजनिक वाचनालय निर्मिती केली. 1870 रोजी पोलीस दल, न्यायालय व फातिमा रुग्णालयाची निर्मिती, वन विभागाची निर्मिती, रस्ते, विहिरी, धर्मशाळा, तसेच खेळांना प्रोसाहन दिले. अश्या विविध सुविधा निर्माण करून एक आदर्श नवाब म्हणून त्यांनी आपली ख्याती निर्माण केली होती. जंजिरा संस्थान हे नवाब यांच्या कार्यपद्धतीमुळे गाजले.
कोल्हापूरचे राजर्षि शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, ग्वाल्हेरचे महादजी शिंदे, बद्रुद्दीन तय्यबजी यांच्याशी जंजिर्याचे नवाबाचे मैत्रीचे संबंध होते. त्यामुळे आधुनिक विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव निर्माण होऊन इतर संस्थानाप्रमाणे त्यांनी जंजिरा संस्थानमध्ये नवीन नवीन विकासात्मक सुधारणा करून लोकांची मने जिंकली. त्यांच्या या आधुनिक सुधारणा व प्रशासनाचे कौशल्य पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना केसीआय ही पदवी बहाल केली होती. जंजिरा संस्थानात दुष्काळाच्या काळात नवाबांनी 1500 गोणी तांदुळ अल्प दराने रयतेला वाटला होता.
नवाब सर्व जनतेला सारखे मानून त्यांच्या सण उत्सवात सहभागी होत होते. त्यांची पत्नी नाझली रफिया या बद्रुद्दीन तय्यबजी यांच्या पुतणी व अरुण असफअली व ए. ए. फैयजी यांच्या भाची होत्या. त्यामुळे आधुनिक विचाराचा वारसा रफिया बेगम लहानपणापासून लाभला होता. त्यांनी सर सिद्धी अहमद खान याना जंजिरा संस्थानच्या नवीन सुधारणांसाठी महत्वाची साथ दिली होती. रफिया बेगम यांनी 1907 साली महिलांचे बझमी इतिहाद मंडळ स्थापन करून 24 हिंदू व 14 मुस्लिम यांचे संघटन तयार केले होते.
15 आगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला परंतु काही संस्थाने हिंदी संघराज्यात शामिल झाली नव्हती त्यापैकी मुरुड जंजिरा हे संस्थान होते. प्रजापरिषदेच्या कार्यकर्त्यांनी महाडचे समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव येथील नांदवी या गावी 1500 सशस्त्र क्रांतिकारकांची बैठक घेतली. या बैठकीत प्रजा परिषदेचे तीन सदस्यीय मंत्री मंडळ नेमणूक करण्यात आली.
या सशस्त्र क्रांतिकारांनी 29 जानेवारी 1948 रोजी म्हसळ्यात प्रवेश करून म्हसळ्यातील तहसील कचेरी, ट्रेझरी, पोलीस ठाणे यांचा कारभार प्रशासक या नात्याने हरिभाऊ भडसावळे यांनी ताब्यात घेतला त्याच प्रमाणे 30 जानेवारी 1948 रोजी श्रीवर्धनच्या ताबा प्रशासक या नात्याने राजाभाऊ चांदोरकर यांनी घेतला, ताब्यात असणारे दोन तालुके नवाबाच्या हातामधून गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने 31 जानेवारी 1948 रोजी नवाबाने देशाच्या सामील नाम्यावर सही केल्यामुळे सदरचा दिवस म्हणजेच 31 जानेवारी 1948 हा दिवस जंजिरा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जात आहे.
-संजय करडे, खबरबात