पर्यावरणमंत्र्यांनी गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी
मोहोपाडा : प्रतिनिधी
वणवे लागत असल्याने शेतकरी वर्गाची आणि राज्य सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. गावोगाव लावले जाणारे वणवे रोखण्याचे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान ठरत आहे. वणव्यामुळे वनसंपदा तसेच वन्यजीवांचा र्हास होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर निर्माण होत असून यासाठी वणवाविरोधी अभियान राबवून जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.जानेवारी ते अगदी मे महिन्यांपर्यंत कोकणात वणवे लावण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. दिवसेंदिवस वणवे लावण्याच्या या प्रवृत्तीत वाढच होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. पावसाळ्यात वाढलेले माळरानावरील गवत वनस्पती तसेच डोंगरांवरील वनसंपदा या पक्षाची घरटी, मुंग्यांची वारूळ, वनात राहणारे पक्षी सर्पटनारे प्राणी या वणवा लागल्याने त्यांचे प्राण जाण्याची वेळ निर्माण झाली आहे, असे चित्र आपणास तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. एखाद्या व्यक्तीने बेतालपणे लावलेल्या वणव्याची झळ अर्मयादपणे पसरुन त्यात शेकडो एकर जमिनीवरील वनसंपत्ती नष्ट होवून ही माळराने व डोंगरे अक्षरश: ओसाड पडत आहेत. या वणव्यात वनसंपदेसह असंख्य वन्यजीव, जनावरे देखील नष्ट होत असून त्याचा परिसरातील पर्यावरणावर विपरीत परिणाम होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवर्षी जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर वणवे लागतात. परिणामी या आगीत झाडे-झुडपे, पशू-पक्षी, सु्क्ष्मजीव तसेच सरपटणारे प्राणी यांचा जळून मृत्यू होवुन सजिवसृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वणवे हिरवीगार वनसंपदा नष्ट करीत आहेत. याबरोबरच विविध ऐतिहासिक वास्तू आणि किल्ल्यांवरील हे वणवे या ऐतिहासिक वस्तूंना देखील नुकसान पोहचवत आहेत. गवत जळल्याने गवतावर अवलंबुन असणार्या गुरे-ढोरांवर उपासमारीची वेळ येते. मोठ्या प्रमाणात सजिवसृ्ष्टीचे नुकसान होते. या वणव्यांवर नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पर्यावरणमंत्र्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी करीत आहे.