
कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यातील उल्हासनदीच्या दहिवली-मालेगाव पुलालगत असलेल्या स्मशानभूमी अंत्यसंस्कार शेडचे पावसाच्या पाण्याने नुकसान झाले आहे. नदीच्या धामोतेकडील बाजूस असलेल्या स्मशानभूमी शेडचे लोखंडी खांब आणि पत्रे जमिनीवर पडून वाहून गेले आहेत. ही गरज लक्षात घेऊन दहिवली ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोसळलेले पत्र्याचे शेड बाजूला करून ठेवण्यात आले असून तेथे नव्याने शेड उभे करण्याचे धोरण ग्रामपंचायतने आखले आहे. पण पत्र्याची शेड काही वर्षे उलटल्यावर आगीच्या लोळाने खराब होते. ही बाब लक्षात घेऊन आरसीसी पध्दतीने शेड बांधली जावी, अशी सूचना ज्येष्ठ ग्रामस्थ रामचंद्र भवारे गुरुजी यांनी केली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत निधीची उपलब्धता करून स्मशानभूमी शेड बांधण्याची कार्यवाही करील, असे आश्वासन सरपंच चिंधू तरे आणि उपसरपंच यशवंत भवारे यांनी ग्रामस्थांना दिले आहे.