अस्मितेचा अभिनिवेश भविष्य घडविण्यासाठी कामी येत नाही हे वास्तव आहे. गणित आणि विज्ञान हे दोन्ही विषय नीट समजून घ्यायचे असले तर विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच ते शिकवले पाहिजेत असे देशोदेशीचे नाणावलेले शिक्षणतज्ज्ञ परोपरीने सांगत असतात. परंतु जपान, रशिया असे काही मोजके देश वगळता जगातील बहुतेक देशांनी इंग्रजी भाषेचाच ज्ञानभाषा म्हणून स्वीकार केलेला दिसतो.
‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य जाणतो मराठी’ या कविवर्य सुरेश भट लिखित मराठी अभिमानगीताच्या ओळी आज, गुरुवारी सर्व मराठी घराघरांतून ऐकू येतील. या नितांतसुंदर महाराष्ट्रगीताची ओळख महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडित झालेली आहे. बहुतेक मराठी मोबाइल फोनमध्ये या गीताची रिंगट्यून सापडते किंवा मराठी तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये हे अभिमानगीत सापडतेच. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणून आपण सारी मराठी माणसे ‘मराठी भाषा दिन’ साजरा करतो. आपल्या मायमराठीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणार्या कविवर्य कुसुमाग्रजांचे आजच्या दिवशी तरी पुण्यस्मरण केलेच पाहिजे. मायमराठीच्या गळ्यातील अनेक माणकांपैकी एक तेजोमय रत्न म्हणजे कुुसुमाग्रज. ‘आपल्या मायमराठीला मंत्रालयासमोर भिकार्यासारखे उभे करू नका’ अशी काव्यमय याचना करणारे कुसुमाग्रज आज हयात असते तर त्यांना मराठीचे हाल बघून निश्चितच दु:ख झाले असते. कारण ज्यांच्यासाठी कुसुमाग्रजांसारख्या अनेक कविश्रेष्ठांनी काव्ये रचली, साहित्य निर्माण केले ते रसिक मराठी वाचक आता उतरणीला लागलेले दिसतात. मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणारे सोडाच, मराठीचा उपयोग करणारे लोक देखील आताशा कमी होऊ लागले आहेत. इतकेच नव्हे तर अभिमानाने स्वच्छ मराठी बोलणारी माणसे देखील कमी होऊ लागली आहेत. निदान शहर भागात तरी मराठी भाषेची हीच अवस्था आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या वेगाने कमी होत असून वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 305 मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने नुकताच घेतला. आपल्या मुलाला किंवा मुलीला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेले बरे असे व्यावहारिक पाऊल अलीकडे कित्येक मराठी पालक उचलताना दिसून येतात. स्पर्धेच्या जगामध्ये आपले मूल टिकून रहावे या विचाराने पालकांनी असा निर्णय घेतला तर त्याला चूक तरी कसे म्हणावे? इंग्रजीत विपुल प्रमाणात उपलब्ध असलेले ज्ञान इंग्रजी भाषेतच विद्यार्थ्यांना आयते वाढून टाकायचा ‘शॉर्टकट’ बहुतेक देशांतील सत्ताधार्यांनी आजवर राबवला. मात्र यात आता बदल होतो आहे. उत्कर्षाचे सर्व दरवाजे इंग्रजी भाषेच्या किल्लीनेच उघडतात हा भ्रम हळूहळू दूर होतो आहे. आपल्या देशातही त्या दिशेने धोरणात्मक पावले पडू लागलेली आहेत. महाराष्ट्रात मात्र मराठी भाषेचे नष्टचर्य अजून संपताना दिसत नाही. मराठी भाषा शाळांमध्ये सक्तीची करावी की न करावी याच मुद्द्यावर आपण अजूनही घोटाळतो आहोत. खरे सांगायचे तर, भाषा ही गोष्ट सक्तीची होऊच शकत नाही. विविधतेतून एकता साधणार्या आपल्या देशात भाषेची सक्ती ही अन्यायकारकच मानावी लागेल. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळो अथवा न मिळो, अस्सल मराठी माणसासाठी ती अभिजात भाषाच असते. परंतु मराठी भाषादिनी ‘लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी’ ही ओळ गुणगुणताना थोडेसे ओशाळवाणे वाटले तर आजचा दिवस सत्कारणी लागला असे म्हणायचे.