Breaking News

कर्जतच्या दरोड्याचा 24 तासांत छडा

सर्व आठ आरोपींना बेड्या

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील तिवरे येथील बंद असलेल्या फार्म हाऊसमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न 3 मार्च रोजी झाला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने या दरोडेखोरांना 24 तासांत गजाआड केले आहे. तिवरे गावच्या हद्दीत सालब्रो पोल्ट्री फार्म, नाजव्हिला बंगल्यात दरोड्याचा प्रकार घडला होता. गुन्ह्यातील आरोपींनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेजच्या वायरी कापून व ते डीव्हीआर घेऊन गेल्याने आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. त्यामुळे गुन्ह्याचा समांतर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला होता. या पथकाने आरोपी अरुण मारुती वाघचौरे (वय 39, रा. संजयनगर वाडी, वदप-गौरकामत, ता. कर्जत), राम हरि पवार (वय 32, गौरकामत, ता. कर्जत), वसंत राम पवार (32, रा. डोणेवाडी, ता. कर्जत), नरेश इका वाघमारे (32, डोणेवाडी, पो. साळोख, ता. कर्जत), विलास पुरुषोत्तम वाघमारे (34, गौरकामत, ता. कर्जत), सीताराम मारुती पवार (34, मोरेवाडी, ता. खालापूर, सध्या रा. गौरकामत, ता. कर्जत), अमर पुरुषोत्तम जाधव (37, तांबस, ता. कर्जत) आणि विजय बाळू कोळंबे (50, रा. चांदई, पो. नसरापूर, ता. कर्जत) यांना अटक केली. पोलीस पथकाने कर्जत आणि परिसरात पाठलाग करून त्या सर्वांना ताब्यात घेतले असता, त्या सर्वांनी आपण गुन्हा केल्याचे कबूल करून घटनाक्रम कथन केला. नमूद आरोपींपैकी पहिले दोन सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खालापूर, नेरळ, वडगाव मावळ, आणि कर्जत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. सर्व आरोपींना कर्जत पोलिसांनी  भा. दं. वि. कलम 395, 398 अन्वये अटक केली आहे. कर्जत प्रथम वर्ग न्यायालयाने या सर्वांची 11 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. आर. भोर करीत आहेत.

असा केला पोलिसांनी तपास

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. एन. शेख यांनी अधिकारी-अंमलदार यांना सोबत घेऊन तपास काम सुरू केले होते. त्यांनी या गुन्हयातील अज्ञात आरोपींबाबत खबर्‍यांमार्फत स्थानिक पातळीवर माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस शिपाई संदीप चव्हाण यांना गुन्ह्यातील आरोपींबाबत महत्त्वाची माहिती प्राप्त झाली होती. त्यांनी शेख यांच्या कानावर ती माहिती दिली. या माहितीबाबत संबंधित तांत्रिक बाबींची सत्यता पडताळून सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पोलीस हवालदार सुभाष पाटील, महेश पाटील, दिनेश पिंपळे, सागर शेवते, पोलीस शिपाई संदीप चव्हाण, आवळे, अनिल मोरे यांचे विशेष पथक नियुक्त करण्यात आले आणि कर्जत परिसरात पाठलाग करून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply