Breaking News

पनवेल महापालिकेचा करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल महापालिकेचा सन  2019-20चा सुधारित आणि सन 2020-21चा कोणतीही करवाढ नसणारा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 6) स्थायी समितीत आयुक्त गणेश देशमुख यांनी सादर केला. सदस्यांनी त्यावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितल्याने शुक्रवारची सभा तहकूब करण्यात आली. आता 11 मार्च रोजी होणार्‍या स्थायी समिती सभेत तो मंजूर करण्यात येईल. 

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त गणेश देशमुख यांनी स्थायी समिती अध्यक्ष प्रवीण पाटील यांना अर्थसंकल्प सादर करून समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सुचवलेली नाही. या आर्थिक वर्षात 525.90 कोटी उत्पन्न अपेक्षित असून, 362.05 कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सन 2019-20च्या मूळ अर्थसंकल्पात 906 कोटी उत्पन्न अपेक्षित धरले गेले असून, 904.31 कोटी खर्च अपेक्षित आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात या वर्षी अनेक ठिकाणी पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले. त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी करावयाच्या खर्चाची तरतूद वेगळी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजना, रस्ते, सुसज्ज अग्निशमन सेवा, महापालिकेत समाविष्ट झालेल्या 29 गावांचा पायाभूत विकास यासाठी आवश्यक नवीन प्रकल्पांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. दिव्यांग कल्याण, महिला व बालविकास, मागासवर्गीय व अल्पसंख्याक घटक आणि क्रीडा व सांस्कृतिक शासन धोरणानुसार तरतूद करण्यात आली आहे.

पनवेल महापालिकेच्या कार्यालयाकरिता आवश्यक जागेसाठी सिडकोकडून भूखंड घेऊन त्यावर बांधकाम करण्यासाठी पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. आस्थापना खर्चात नवीन मनुष्यबळ मिळेल असे गृहीत धरून खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, असे या वेळी आयुक्तांनी सांगितले.

-या अर्थसंकल्पात यंदा चालू केलेले व पुढील वर्षात पूर्ण होणारे प्रकल्प

1. कृष्णाळे आणि देवाळे तलावाचे काम, 2. पुतळे व परिसर सुशोभीकरण, अ. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ब. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, 3. प्राथमिक कन्या शाळेचे काम, 4. र्फिडसवाडा पनवेल समाजमंदिर, 5. जुनी प्रशासकीय इमारत, 6. मेगाकिचन बांधकाम, 7. महात्मा गांधी उद्यान सुशोभीकरण, 8. 3500 स्ट्रीट लाइट्स, 9. स्मार्ट व्हिलेज योजना (चार गावांची), 10. अमृत ग्रीन स्पेस योजना, 11. अमृत पाणीपुरवठा योजना, 12. रस्ते काँक्रीटीकरण, 13. भुयारी गटारांची निर्मिती, 14. कर आकारणीसाठी मालमत्तांचे सर्वेक्षण.

-आगामी वर्षात नव्याने हाती घेण्यात आलेले प्रकल्प

1. छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करणे, 2. पावसाळी जलनि:सारणाची 22 कोटी रुपयांची कामे, 3. स्मार्ट व्हिलेज योजना (नवीन पाच गावे), 4. स्मशानभूमींचा विकास, 5. बगीच्यांचा विकास, 6. नवीन सात किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण, 7. पंतप्रधान आवास 2300 घरांची योजना, 8. स्वराज्य नवीन मुख्यालय इमारत बांधकाम, 9. प्रभाग कार्यालय बांधकाम-खारघर, कळंबोली आणि कामोठे, 10. भाजी मार्केट अं. भू. क्र. 193चे बांधकाम, 11. मालमत्ता कराचे संगणकीकरण, 12. विकास योजना पूर्णत्वास नेणे, 13. डेली बाजारचे बांधकाम, 14. अमृत पाणीपुरवठा योजना, 15. कोपरा आणि जुई तलावाचे सुशोभीकरण.

-अर्थसंकल्पातील जमेच्या बाजू व खर्च

– अर्थसंकल्पातील जमेच्या बाजू : मालमत्ता व इतर कर 205 कोटी, वस्तू व सेवा कर अनुदान 125 कोटी, 1% मुद्रांक शुल्क अनुदान 60 कोटी, अमृत/नगरोत्थान योजनेतंर्गत अनुदान 98 कोटी, विकास शुल्क 25 कोटी, सहाय्यक अनुदान 30 कोटी, ठेवींवरील व्याज 15 कोटी. खर्चाच्या बाजू : आस्थापना खर्च 68 कोटी, घन कचरा संकलन, वाहतूक व मनुष्यबळ 80 कोटी, रस्ते दुरुस्ती, काँक्रीटीकरण व डांबरीकारण 50 कोटी, विकास योजना पूर्णत्वास नेणे 50 कोटी, स्वराज्य नवीन प्रशासकीय भवन 35 कोटी, गावठाण परिसरात पायाभूत सुविधा उभारणे 25 कोटी, पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना 15 कोटी, अमृत/नगरोत्थान योजनेतंर्गत अनुदान 98 कोटी, स्वच्छ भारत अनुदान 10 कोटी.

पनवेल महापालिकेचा प्रशासनाने मांडलेला अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे. त्यामध्ये आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांसाठी तरतूद केली आहे किंवा नाही, आम्हाला जे प्रोजेक्ट महत्त्वाचे वाटतात त्याचा समावेश यामध्ये केला आहे का? हे सर्व पाहून आम्ही तो पुढील सभेत मंजूर करू.

-परेश ठाकूर, सभागृह नेते,

पनवेल महापालिका

पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांनी स्थायी समितीत मांडला, पण सर्व सदस्यांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ मागितल्याने आजची सभा स्थगित करण्यात आली. 11 मार्च रोजी होणार्‍या सभेत त्यावर चर्चा करून मंजुरी देण्यात येईल.

-प्रवीण पाटील, स्थायी समिती अध्यक्ष

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply