Breaking News

कोरोनाबाधितांची विक्रमी वाढ

देशात दर तासाला हजारापेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात शनिवारी (दि. 11) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 27 हजार 114 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ आहे. याचाच अर्थ दर तासाला एक हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधित देशात आढळून येत आहेत. यासोबतच देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन रुग्णांची वाढ होऊन एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आठ लाखांच्या पुढे गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांमध्ये कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली असून, 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या दोन लाख 83 हजार 407 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पाच लाख 15 हजार 386 रुग्ण बरे झाले आहेत, तर 22 हजार 123 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून देशात प्रतिदिन 20 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील पाच दिवसांपासून तर यात वाढ होऊन 25 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
देशातील पाच राज्यांमध्ये सर्वांत जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या आढळली आहे. 24 तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक 7862, त्याखालोखाल तमिळनाडू 3680, कर्नाटक 2313, दिल्ली 2089 आणि तेलंगणामध्ये 1278 नवीन रुग्ण आढळले आहेत.
अनेक राज्यांकडून लॉकडाऊनचा अवलं
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून सातत्याने विविध राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. रुग्णवाढीची ही साखळी तोडण्यासाठी अनेक राज्यांनी गरजेप्रमाणे स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाऊन करण्यास सुरुवात केली आहे.
रिकव्हरी रेटही वाढला
जगभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जरी देशात वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्यादेखील वाढतच आहे. देशात सध्याच्या घडीला कोरोनामुक्त झालेल्या संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत तब्बल पाच लाख 15 हजार 385 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशात उपचार सुरू असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या जास्त आहे. सध्या देशातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाख 31 हजार 978 आहे. देशपातळीवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 62.78 टक्क्यांवर पोहचले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने हे वृत्त दिले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply