पनवेल : बातमीदार
पनवेल तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात होलिकोत्सव, धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यात आबालवृद्ध, युवक, युवती सहभागी झाले होते. करोनाच्या सावटामुळे काही ठिकाणी नागरिकांमध्ये निरुत्साह दिसून आला.
शहरात विविध ठिकाणी चौकाचौकात होळी उभारण्यात आल्या होत्या. होळीला ’शिमगा’ देखील म्हटले जाते. संध्याकाळपासून महिलांनी नैवेद्य दाखवून होळीची पूजा केली. रात्री 12 वाजता होळी पेटवली. ग्रामीण भागातील बहुतांश गावात होळीची वेगळीच मजा अनुभवायला मिळते. चार पाच दिवस आधीच होळीसाठी लाकडे गोळा केली जातात. त्यानंतर मोठ्यात मोठी होळी रचली जाते. होळीच्या दिवशी संध्याकाळी पारंपारिक पद्धतीची गीते सादर केली जातात. व रात्री 12 वाजता सर्व ग्रामस्थ व नवीन जोडपी होळीत नारळ टाकण्यासाठी येतात. त्यांना ओवाळले जाते. त्यानंतर होळी पेटवली जाते. व पेटलेल्या होळीभोवती ’बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. तालुक्यातील गावांमध्ये देखील रात्री ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिकरीत्या सोमवारी होळीचे दहन करण्यात आले.
शहरामधील प्रत्येक सोसायटीने देखील आपल्या सोसायटीसमोर होळी दहन केली. तर धूलिवंदनाच्या दिवशी देखील शहरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करण्यात आली. यामध्ये तरुणाईचा पुढाकार होता. विधिवत पूजन करून पेटवलेल्या होळीभोवती फेर धरणारी लहान मुले, तरुणाईचा जल्लोष होता. अनेक ठिकाणी होळीभोवती सप्तरंगी रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. तर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच श्रीफळ वाहण्यासाठी गर्दी होती. मोलाचे हे क्षण मोबाइलच्या कॅमेर्यामध्ये टिपण्यासाठी तरुणाई आघाडीवर होती. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी बच्चे कंपनीने पिचकार्या, फुगे घेऊन रंग उडवायला सुरुवात केली होती. यात घरातल्यांनी देखील सहभाग घेतला होता. होळीच्या रंगात सर्वच जण न्हाऊन निघाले होते. मटन खरेदीसाठी रांगा लागल्या होत्या. अनेक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धुलीवंदनानिमित्त शाळा, महाविद्यालयांना, कंपन्यातील कामगारांना सुटी होती.