टोकियो : वृत्तसंस्था
भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारीला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची सर्वाधिक अपेक्षा दीपिकाकडून व्यक्त केली जात होती. पण ही अपेक्षा पूर्ण करण्यात ती अपयशी ठरली. जागतिक क्रमवारीत 9 व्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियाच्या अॅन सॅनने सलग 3 सेटमध्ये दीपिकाचा पराभव केला. दीपिकाला पराभूत करत कोरियन तिरंदाज अॅन सॅनने उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं केलं. पहिला सेट 27-30 असा गमावल्यानंतर, ती पुढील सेटमध्ये कमबॅक करेल असे वाटत होते, पण पुढील दोन्ही सेट तिने गमावले. दुसर्या आणि तिसर्या सेटमध्ये सॅनने 26-24 ने जिंकत दीपिकाला पराभूत करत सामना खिशात घातला. कोरियन तिरंदाज सॅनने याआधी 2 सुवर्ण जिंकले आहेत. महिला आणि मिश्र गटात तिने ही कामगिरी केली आहे, तसेच रँकिंग राऊंडमध्ये तिने ऑलिम्पिक रेकॉर्डही बनवलं आहे. त्यामुळे दीपिकावर याचा चांगलाच दबाव होता. विशेष म्हणजे दीपिकाने 2019मध्ये टोकियो 2020 निवड चाचणीत सॅनला पराभूत केले होते. याचा बदलाही सॅनने घेतला. दरम्यान, उपांत्यपूर्व फेरी गाठणारी दीपिका पहिली भारतीय तिरंदाज ठरली होती. उपउपांत्यपूर्व सामन्यात तिने रशियन ऑलिम्पिक समितीच्या सेनिया पेरोवाचा शूट-ऑफमध्ये पराभव केला होता. पेरोवाने 7 तर दीपिकाने 10 गुणांची कमाई केली होती.