गटविकास अधिकार्यांचे लेखी पत्र; मारुती तवले यांचे आमरण उपोषण स्थगित
खालापूर : प्रतिनिधी
लोधिवली ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणाचा चौकशी अहवाल 20 मार्चपर्यंत जिल्हा परिषदेला पाठविण्याचे लेखी आश्वासन खालापूरच्या गटविकास अधिकार्यांनी दिल्याने मारुती तवले यांनी आपले आमरण उपोषण शनिवारी (दि. 14) स्थगित केले. खालापूर तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीमधील विकासकामांत तसेच 31 लाख रुपयांच्या एलएडी दिवे खरेदी प्रकरण, घंटागाडी दुरुस्ती, स्वतःची इमारत असताना ग्रामपंचायत कार्यालय भाड्याच्या ठिकाणी ठेवणे, कर्मचार्यांच्या नावे धनादेश काढणे आणि ग्रामपंचायत कार्यालय, सदस्यांच्या घरासमोर व परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे अशा अनेक कामांत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ मारुती तवले, धनाजी भुईकोट व एकनाथ सांगळे यांनी कोकण विभागीय आयुक्त ते खालापूर गटविकास अधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीचा ते गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा करीत होते. या भ्रष्टाचाराच्या चौकशीला विलंब होत असल्यामुळे मारुती तवले खालापूर पंचायत समिती कार्यालयासमोर गुरुवार (दि. 12)पासून आमरण उपोषणाला बसले होते. शनिवारी खालापूर पंचायत समितीचे वरिष्ठ गटविकास अधिकारी संजय भोये आणि सहाय्यक गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन 20 मार्चपर्यंत चौकशी अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे पाठविणार असल्याचे लेखी पत्र दिले आणि उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत मारुती तवले यांनी शनिवारी आपले आमरण उपोषण मागे घेतले.
लोधिवली ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणाची 20 मार्चपर्यंत चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे पाठविणार असल्याचे लेखी पत्र दिले आहे. त्याने उपोषणकर्त्यांचे समाधान झाले आहे.
-संजय भोये, वरिष्ठ गटविकास अधिकारी, खालापूर पंचायत समिती