महाड ः प्रतिनिधी
ऐन आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवेची शपथ घेतलेल्या डॉक्टरांनी भीतीने आपले दवाखाने बंद ठेवले आहेत. यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. यामुळे शासकीय आरोग्य सुविधेवर ताण निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने कडक पावले उचलून कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत याबाबत कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकार्यांनी दिले आहेत. सध्या देशभरात कोरोनाचा उद्रेक असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाडमधील अनेक दवाखाने मात्र बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे किरकोळ आजार, हृदयरोगी, मधुमेही अशा विविध रुग्णांचे चांगलेच हाल होत आहेत. काही दवाखाने सकाळी एक वेळच सुरू ठेवण्यात येत आहेत. यामुळे ग्रामीण भागातून येणार्या रुग्णांना उपचार न घेताच परतावे लागत आहे. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत असला तरी दुसरीकडे विविध आजारांनी त्रस्त नागरिक उपचाराकरिता दवाखान्यात धाव घेत आहेत, मात्र दवाखाने बंद ठेवल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. आपत्कालीन स्थितीत केवळ शासकीय रुग्णालये सुरू आहेत, मात्र या ठिकाणी असलेला अपुरा कर्मचारीवर्ग आणि सुविधा यामुळे शासकीय रुग्णालयांवरही ताण येत आहे. महाडमध्ये दोन हृदयरोग तज्ज्ञ, सर्जन, बालरोगतज्ज्ञ आणि प्रथमोपचार करणारे अनेक डॉक्टर्स आहेत, मात्र काही दिवसांपासून हे दवाखाने बंद ठेवण्यात आले आहेत. अगदीच इमर्जन्सी असली तरीही रुग्णांना घेतले जात नाही. महाडमधील डायलिसीस सेंटरदेखील बंद आहेत. यामुळे नियमित डायलिसीस घेणार्या रुग्णांना त्रास होत आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील महाड उत्पादक संघटनेचे हॉस्पिटलदेखील बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत महाड उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रारी आल्या आहेत, मात्र आरोग्य अधीक्षक किंवा उपविभागीय अधिकारी यांनी अद्याप कोणतीच उपाययोजना केली नाही. शहरात आरोग्य केंद्र उभे करून तपासणी सुरू केली जावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.
या प्रकरणी महाडमधील सर्व खासगी डॉक्टरांची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये सर्व डॉक्टरांना दवाखाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णसेवा देताना ठरावीक अंतर राखूनच रुग्ण तपासावेत, अशीही सूचना देण्यात आली. सूचना देऊनही दवाखाने बंद ठेवले जात असतील तर कठोर कारवाई केली जाईल.
-विठ्ठल इनामदार, उपविभागीय अधिकारी, महाड