मुंबईवर दररोज कोणते ना कोणते संकट कोसळतच असते. त्या संकटातून सहीसलामत बाहेर पडून पुन्हा नव्याने जगण्याची धडपड सर्वसामान्य करीतच असतो. गुरुवारी सीएसएमटी येथे झालेली पूल दुर्घटना ही मानवी चुकीनेच झाली आहे.त्या बेपर्वाईचे बळी सर्वसामान्य मुंबईकर जात असले तरी या दुर्घटना पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे जीवन खरोखरंच असुरक्षित असेच झाले आहे. या महानगरीत कधी काय होईल हे सांगणेच कठीण. कधी कुठला पूल कोसळेल, तर कधी दहशतवादी हल्ला करतील याचा नेम नाही. त्यामुळे सर्व मुंबईकरांना दररोज आपला जीव सांभाळूनच नित्याची कामे करावी लागत आहेत. गुरुवारीही अशीच एक गंभीर घटना मुंबईकरांच्या जीवावर बेतली आणि सहा निष्पापांना आपले जीव गमवावे लागले, तर 40हून अधिक गंभीर जखमी झाले. ऐन गर्दीच्या वेळी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे पादचारी पूल कोसळला आणि एकच हाहाकार उडाला. या दुर्घटनेत जीटी रुग्णालयात काम करणार्या तीन नर्सेसनादेखील प्राण गमवावे लागले आहेत. एकूणच या दुर्घटनेने मुंबईतील पादचारी पुलांसह अन्य पुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ज्या पुलावर ही दुर्घटना घडली त्या पुलाच्या निर्मितीला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्या पुलाचे आयुुष्यच संपले. तरीही त्या पुलावरून गेली अनेक वर्षे माणसांची वर्दळ सुरूच होती. या पुलाच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी ही मुंबई मनपाची होती. त्यामुळे गुरुवारी जी घटना घडली त्या घटनेला मुंबई मनपाच सर्वस्वी जबाबदार आहे, हे अधोरेखित झाले आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते, पण त्यावर जी आवश्यक सुधारणा वा दुरुस्ती केली पाहिजे ती करण्यात न आल्याने ही भीषण दुर्घटना घडली. मुंबईत यापूर्वी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवरील पादचारी पूल कोसळून 30 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या पुलाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची होती. त्यामुळे त्यांनी तातडीने लष्कराच्या माध्यमातून या पुलाची फेरनिर्मिती केली आहे. वास्तविक मुंबईत जेवढे पूल आहेत त्यांचीही आता नव्याने निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे पूल मुंबई मनपा, राज्य सरकार, रेल्वे प्रशासन यांनी संयुक्तपणे बांधून मुंबईकरांना दिलासा देणे गरजेचे आहे. कारण जे पूल आहेत ते पूर्णपणे जीर्ण झाले आहेत. ते केव्हाही कोसळून अशा दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आता परस्परांवर आरोप-प्रत्यारोप न करता सर्वांनी कंबर कसून काम करणे हीच काळाची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ज्यांनी या पुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर आता नियमानुसार कारवाई होणार हे निश्चित. अशा दुर्घटना आता मुंबईकरांच्या अंगवळणीच पडल्या आहेत. त्यामुळे शो मस्ट गो ऑन, या म्हणीप्रमाणे मुंबईकर पुन्हा नेहमीच्याच गतीने धावत असतो. कारण मुंबई ही कुणाला स्वस्थ बसू देत नाही. उलट नव्या जोमाने लढण्याची ताकद याच महानगरीने सर्वसामान्य मुंबईकरांना दिली आहे. त्याच स्पिरिटच्या जोरावर मुंबईची जनता दैनंदिन समस्यांना समर्थपणे तोंड देत स्वाभिमानाने जगत आली आहे. यापुढेही ती अशीच धैर्याने जगत राहील. सलाम मुंबईकर!