Breaking News

प्रवीण दरेकर यांनी केली बिरवाडी पुलाची पाहणी

महाड : प्रतिनिधी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी (दि. 3) सकाळी महाड तालुक्यातील नादुरुस्त अवस्थेत असलेल्या बिरवाडी-खरवली पुलाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. या वेळी महाड प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता पाठाडे, भाजप महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, बिपिन महामुनकर, महेश शिंदे उपस्थित होते. महाड तालुक्यातील बिरवाडी आणि वरंध जिल्हा परिषद मतदारसंघातील असंख्य गावांना जोडणारा बिरवाडी नदीलगतचा पूल अतिशय जुना, अरुंद व नादुरुस्त अवस्थेत आहे. बिरवाडीसारख्या महत्वाच्या शहराला आणि औद्योगिक वसाहतीला जोडणारा हा पुल गेली अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. सावित्री पुल दुर्घटनेनंतर या पुलाच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मात्र गेल्या मुसळधार पावसामुळे या पुलाचा दोन्ही बाजूकडील भाग खचू लागला आहे. तसेच वाहतूकीलाही मोठा अडसर निर्माण झाला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय आणि संभाव्य धोका याची गंभीर दखल घेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी बिरवाडी पूलाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी या पूलासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला असून आजतागायत चार वेळा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकार्‍यांनी देताच आमदार प्रवीण दरेकर यांनी पुन्हा युद्धपातळीवर प्रस्ताव पाठवून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply