Breaking News

राहुल आणि प्रियांकासाठी…

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि कार्यवाह प्रियांका वड्रा काहीबाही बोलतात आणि त्याची दखल घ्यावी लागते.चुकीचे संदेश लोकांपर्यंत जाऊ नयेत म्हणून ते क्लेशकारक काम करावे लागते. क्लेश ते वेड्यासारखे बरळतात याचा नुसता होत नाही, तर त्यांना सर्वोच्च नेते म्हणून काँग्रेसने निवडले आहे याचा अधिक होतो. काँग्रेस आता 134 वर्षांची जुनीपुराणी अनुभवसमृद्ध आणि परिपक्व संघटना आहे. गांधीवादाचे किती भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात याचे उदाहरण द्यायचे झाले तर ते या काँग्रेसचे देता येईल. नेहरू घराण्यात सत्ता चालत राहिली तरच आपण सुरक्षित राहू आणि आपण सुरक्षित राहिलो तर देश आपोआपच सुरक्षित राहील, अशी या संघटनेची धारणा आहे. त्यामुळे दुसर्‍या कोणाचेही नेतृत्व येथे फुलू दिले जात नाही. सगळ्यांना मानसिकदृष्ट्या पंगू करून ठेवण्यात आले आहे. राष्ट्रहित डोळ्यांसमोर ठेवून देशासमोरील समस्यांचा विचार करू शकतील अशी पृथ्वीराज चव्हाणांसारखी कर्तृत्ववान माणसे या पक्षात अगदीच नाहीत असे नाही, पण ती नेहरू घराण्यात जन्माला आलेली नाहीत हा त्यांचा मोठा दोष आहे. आश्चर्य म्हणजे इंग्रजांना आणि गांधींना दोघांनाही नेहरू जवळचे वाटत. त्यामुळे देश खड्ड्यात गेला तरी चालेल, पण पटेलांच्या हाती अंतिम सूत्रे द्यायची नाहीत अशी व्यवस्थात्मक शिस्त काँग्रेसने लावून घेतली. काश्मीरचा जळता प्रश्न हे ढळढळीत उदाहरण.

राजीव गांधींची होऊ नये अशी निर्घृण हत्या झाल्यानंतर परिस्थितीच्या दबावामुळे नरसिंहराव पंतप्रधान होऊ शकले. कारण त्यावेळी सोनिया गांधींचे अभारतीयत्व पुसले गेले नव्हते आणि त्यांची दोन मुले लहान होती.त्यामुळे आंबट चेहर्‍याने काँग्रेसने नेहरू घराण्याच्या बाहेर शपथविधी होऊ दिला, पण नरसिंहरावांचे निधन झाल्यावर त्यांचे दहन सोनियाजींनी दिल्लीत होऊ दिले नाही आणि चूक सुधारली.नरसिंहरावांचे प्रदीर्घ काळाचे निजी सहाय्यक राम खांडेकर यांनी त्या शोकाकुल दिवसातील नेहरू घराण्याच्या असहिष्णुतेचे सविस्तर वर्णन केले आहे. ते वाचून हा देश एकट्या नेहरूंचा की आपल्या सगळ्यांचा, असा प्रश्न पडतो.

तर आमचा पक्ष प्रेमाचा संदेश पसरवतो आणि मोदींचा पक्ष द्वेषाचे वातावरण निर्माण करीत आहे, असे जे राहुल गांधी सारखे सांगत आहेत ते तराजूत घालून तोललेच पाहिजे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसने दिल्लीत शिखांची जी वेचून मोठी कत्तल केली तो प्रेमाचा कुठला प्रकार होता? ’भावबंधन’मध्ये गडकर्‍यांनी  महेश्वराच्या तोंडून प्रेमाचे अनेक प्रकार सांगितले आहेत, पण त्यांना हा प्रकार माहीत नव्हता असे दिसते. इंदिराजींचा सुरक्षारक्षक असलेल्या एका शिखाने त्यांची हत्या केली म्हणून काँग्रेसने दिसेल त्या शिखाला जगातून नाहिसा करण्याचा अमानुषपणा केला. धरणीकंप होतो तेव्हा काही झाडे पडतातच, असे वैश्विक सत्य राजीव गांधींनी सांगितले. इंदिराजींची हत्या पूर्णपणे निषेधार्ह आहेच आणि कोणत्याही कारणास्तव समर्थनीय नाही, पण तिने सर्व भारतीयांना आत्मपरीक्षणास प्रवृत्त केले पाहिजे होते आणि हत्या करणारा ज्या समाजातून आला तो समाज मुख्य प्रवाहापासून दूर जाणार नाही याची काळजी घेण्याचे भान सर्वांनीच विशेषतः राज्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी ठेवले पाहिजे होते. ते काँग्रेसला जमले नाही.कारण जगण्याचा, राज्य भोगण्याचा आणि शिक्षा करण्याचा अधिकार नियतीने केवळ आपल्याला दिला आहे असा अहंकारी भाव नेहरू घराण्याने जोपासला आहे. म्हणून ज्यांनी आपले चारित्र्य निर्विवादपणे सिद्ध केलेले नाही आणि ज्यांच्या नावावर कसलीही लोकसेवा जमा नाही अशा राहुल आणि प्रियांका या अपत्यांना पंतप्रधान होण्याचा आपला हक्कच आहे असा भ्रम होऊ लागला आहे.

1857च्या स्वातंत्र्यसमरात शिखांचा सहभाग नाही. सावरकरांना त्याची बोच होती.म्हणून या समराचा सुवर्णमहोत्सव त्यांनी 1907मध्ये ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून लंडनमध्ये प्रगटपणे साजरा केला. तेव्हा त्यांच्या संयोजनात त्यांनी सहेतुकपणे शीख विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. ब्रिटिशांच्या सैन्यातील शीख जवानांच्या कुटुंबीयांशी सावरकरांचे जवळचे संबंध होते आणि त्यांच्यातील राष्ट्रभावना विझणार नाही आणि ते भाडोत्री सैनिक बनणार नाहीत याची ते काळजी घेत. इंदिराजींच्या हत्येने काँग्रेसला जेवढे दु:ख झाले तेवढे संघाला आणि भाजपलाही झाले, पण त्यांनी शीख समाज वेगळा पडणार नाही यासाठी आचारविचारांची सर्व पथ्ये पाळली. काँग्रेसला हे भान राहिले नाही आणि राहत नाही.

शिखांच्या धर्मगुरूंचे कार्य राष्ट्रीय पुनरुत्थानाचे आहे याची जाणीव त्या समाजाला करून देण्यासाठी सावरकरांनी शिखांचा इतिहास लिहिला. तसे म्हटले तर काँग्रेसमध्ये काका गाडगिळांनीही शिखांचा इतिहास लिहिला, पण काकांचे मन स्वच्छ नाही आणि त्यांच्या मनात मुसलमानांविषयी विकल्प आहेत असे नेहरूंना वाटत असे, असे काकांनीच आत्मचरित्रात लिहून ठेवले आहे.आम्ही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे ध्येय ठेवले, पण राष्ट्रीय एकात्मतेसाठी काही केले नाही, असे काकांनी त्यांच्या ’चॉकलेटची वाडी’ या लेखसंग्रहात विषादाने म्हटले आहे. सावरकरांच्या सामाजिक सुधारणा आणि विज्ञाननिष्ठा तसेच सयाजीराव महाराज गायकवाड यांचा पुरोगामी, सर्वसमावेशक आणि समाज एकात्म एकसंध ठेवणारा राज्यकारभार यांचा आदरार्थी उल्लेख काँग्रेस क्वचित करते. कारण त्यांनी एका समाजाला दुसर्‍या समाजाविरुद्ध भडकावले नाही आणि राष्ट्र बळकट कसे होईल याचाच प्राधान्याने विचार केला. डॉ. ना. भा. खरे यांच्यापासून ते यशवंतराव चव्हाण आणि ए. डी. गोरवालांपर्यंत काँग्रेसने अनेकांना नेहरूंशी किंवा इंदिराजींशी जमत नाही म्हणून छळले आहे. तो काँग्रेस परंपरेचा भाग आहे. आपल्याशी प्रत्येक विषयात सहमत होत नाहीत म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ते काँग्रेसचे लोकांनी निवडून दिलेले अध्यक्ष असताना मोहनदास गांधींनी जो निर्दयपणे छळ केला त्याला तुल्यबल उदाहरण भारतातील दुसर्‍या कोणत्याही राजकीय पक्षाच्या इतिहासात सापडत नाही. असे काँग्रेसचे प्रेमपुराण थोडक्यात सांगितले.

काँग्रेसच्या प्रेमसरितेचा उगम भ्रांत तत्त्वज्ञानातून झाल्याने तिच्या प्रवाहाच्या काठावरचे लोक सुखी होत नाहीत. राष्ट्र ही संकल्पना माणसाला एकात्म, एकसंध, समृद्ध आणि समाधानी करते. काँग्रेसने भारताचा राष्ट्रवाद ठरविण्याचे कार्य मुसलमानांच्या इच्छेवर सोपवल्याने ते अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे कोणावर प्रेम करावे आणि कोणाला प्रेम शिकवावे हे काँग्रेसला कळत नाही. गांधींना इस्लामची पुनर्स्थापना करायची होती आणि नेहरूंना सगळेच अधांतरी ठेवायचे होते. म्हणून भारताची धर्मशाळा झाली, पण धर्मशाळेत प्रेम नसते,

लुटालूट असते, असो.

-अरविंद विठ्ठल कुळकर्णी

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply