Breaking News

जान भी है और जहान भी है

कोरोनाचा आता आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर फैलाव होऊ लागला आहे. त्यामुळेच उच्चस्तरावर झालेल्या बैठकीत सर्व मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी केली असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुकूलता दर्शविली. त्याचबरोबर पुढच्या काळात आपल्याला ‘जान भी है और जहान भी है’ तत्त्वावर या संकटात काम करायचे आहे, असा मूलमंत्र दिला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्याची मुदत संपत आल्याने पुढे काय करायचे या संभ्रमात सारे होते. त्यादृष्टीने शनिवारी पंतप्रधान आणि सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाऊनसंबंधी विचारविनिमय करून सर्वांची मते जाणून घेतली. या वेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवला जावा अशी मागणी केली. ओडिशा आणि पंजाब या राज्यांनी तर यापूर्वीच लॉकडाऊनची मुदत पंधरा दिवसांनी वाढविली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान मोदी लॉकडाऊन वाढवतील अशी शक्यता होती. त्यानुसार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केली असून लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यास संमती दिली आहे. अर्थात, स्वत: पंतप्रधानांनी त्यांची घोषणा केली नसली तरी या बैठकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचे घोषित केले. यावरून सक्षम नेतृत्व आणि जागतिक पातळीवर ज्यांचा गवगवा असलेले आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी या संकटाशी पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट होते. आतापर्यंत आपण जान है, तो जहान है असे म्हणत होतो. आता पुढच्या काळात आपल्याला जान भी है और जहान भी है या तत्त्वावर या संकटात काम करायचे आहे, असा मनोदय त्यांनी या वेळी बोलून दाखवलाय. त्या अनुषंगाने येत्या दिवसांत काही अधिक कठोर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणार्‍यांना अडथळा होऊ नये याबाबतही दक्षता घेण्यात येऊ शकते. दुसरीकडे या बैठकीपूर्वीच केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात सात कोटी 92 लाख शेतकर्‍यांच्या बँक खात्यात या चालू आर्थिक वर्षात 15 हजार 841 कोटी निधी जमा केला आहे. या योजनेतंर्गत उच्च उत्पन्नातील वगळता सर्व शेतकर्‍यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये तीन टप्प्यात दिले जातात. दोन हजार रुपये याप्रमाणे हा मदतीचा हात दिला जातो. शेतकर्‍यांबरोबरच मच्छीमारांना केंद्राने दिलासा दिला आहे. लॉकडाऊनच्या काळात मासे पकडणे, त्याची विक्री, प्रक्रिया, वाहतूक आदींना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. बीजनिर्मितीवरील बंदीही उठवण्यात आली आहे. अन्य घटकांनाही जगणे सुकर होईल या दृष्टीने काम सुरू आहे. एकूणच पंतप्रधान हे आपल्या देशाला कोरोनाच्या संकटापासून वाचविण्यासाठी पूर्ण क्षमतेने झटत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री तसेच मुख्यमंत्री, प्रशासन, पोलीस यंत्रणा कार्यरत आहेत. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सर्वांनी मिळून कोरोनाविरोधात लढा दिल्यास हे अरिष्ट आपण नक्कीच पळवून लावू. काही अपवाद वगळता नागरिकांनी आतापर्यंत धीर आणि संयमाने साथ दिली आहे. आगामी काळात कसोटी असेल. तिच्यावर मात करणेही आपल्याच हाती आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply