Breaking News

मुंबईतील निर्भयाचा अखेर मृत्यू

देशभरातून संतप्त प्रतिक्रिया; आरोपीला फाशी देण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.
घरोघरी गणेशोत्सव साजरा होत असताना शुक्रवारी मुंबईतील एक धक्कादायक घटना समोर आली होती. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रूमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. महिलेवर उपचार सुरू होते, मात्र तिची स्थिती खूप गंभीर होती. उपचार सुरू असतानाच शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला.


माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार, नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी -फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साकीनाक्यात घडलेला हा प्रकार मन सुन्न करणारा आहे. ज्याप्रकारे गेल्या महिन्याभरात बलात्काराच्या घटना घडत आहेत, त्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. राज्यात विविध ठिकाणी अशा घडत आहेत. अतिशय भयंकर अशा या घटना आहेत. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात असे घडल्याने लौकिकाला धक्का पोहचतो. हा प्रकार तर माणुसकीला काळिमा फासणारा आहे. आमची मागणी आहे की, या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा, फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण न्यावे आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

राज्य सरकारने जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी चर्चा करून कारवाई करावी. राज्यात एकामागोमाग एक घटना होत आहेत. आम्ही काही बोललो की बोलायचे आम्ही राजकारण करतो. शक्ती कायदा आणणार होते त्याचे काय झाले?
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

भाषणे करण्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करा -चित्रा वाघ
माफ कर ताई आम्हाला. कुठल्या वेदनेतून तू गेली असशील याची कल्पनाही करवत नाही. तिला काय वेदना झाल्या असतील, पण या मुर्दाड सरकारला याचे देणेघेणे नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटे छाटली जातात, पण कुठे एफआयआरही नोंदवली जात नाही. गणरायाने या सरकारला सद्बुद्धी द्यावी. महिला अत्याचारावर फक्त भाषणे करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक होत म्हणाल्या.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply