Breaking News

रेवदंड्यात परप्रांतीय कामगाराचा दफनविधी; सामाजिक कार्यकर्त्याने जपली माणुसकी

रेवदंडा ः प्रतिनिधी

सध्या जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अशातच रेवदंड्यात वास्तव्यास असलेला एक परप्रांतीय नेपाळी मृत पावला, मात्र लॉकडाऊनमुळे त्याच्या कुटुंबीयांना कळविणे व मृतदेह नेपाळमध्ये पाठवणे जिकिरीचे काम होते. या वेळी रेवदंड्यातील सामाजिक कार्यकर्ते सलीम तांडेल यांनी पुढाकार घेऊन या परप्रांतीय बांधवाचा दफनविधी पार पाडला. 

रेवदंडा येथे चायनीज हॉटेलमध्ये काम करणारा परप्रांतीय नेपाळी पुरण शुक्रा ग्लोबा रेवदंडाकरांच्या परिचित होता. गेले वर्षभर तो आजारी असल्याचे सांगितले जात होते. लॉकडाऊन काळात त्याचे रोजंदारीचे काम बंद झाले. अगोदरच आजारी, त्यामध्ये उपासमारीने तो रेवदंडा हरेश्वर मैदानाच्या कोपर्‍यातच सोमवारी मरण पावला. पोलीस पाटील स्वप्निल तांबडकर यांनी पोलीस ठाण्यास त्याच्या मृत्यूची बातमी कळविली. परिसरात मृत व्यक्तीचे सगेसोयरे नसल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पंचाईत निर्माण झाली होती. अशा वेळी सामाजिक कार्यकर्ते सलीम तांडेल यांनी स्वतः पुढाकार घेऊन माणुसकीच्या नात्याने या मृत पावलेल्या परप्रांतीय नेपाळी बांधवाचा दफनविधी पार पाडला. या कामी पो. नि. सुनील जैतापूरकर, हवालदार विनोद गायकवाड, जाधव  आदींसह रेवदंडा ग्रा. पं. वतीने सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चुनेकर तसेच केदार चेरकर, महेंद्र पडवळ, जयेश शेणवईकर, असिफ गोंडेकर, इक्बाल फटाकरे, पोलीस पाटील स्वप्निल तांबडकर यांचे सहाय्य लाभले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply