Breaking News

विस्कटलेली मने

महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्तांतर झाल्यानंतर राजकारणाला वेगळीच दिशा मिळणे स्वाभाविकच होते. अचानक झालेल्या पक्षांतर्गत उठावानंतर शिवसेनेचे गलबत खडकावर आपटून त्याच्या ठिकर्‍या होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनालाच उठावाची पहिली ठिणगी पडली होती असा गौप्यस्फोट सांगोल्याचे ‘झाडी, डोंगर’फेम आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. ते खरे असेल तर शिवसेना नेतृत्वाने संभाव्य उठावाची वेळीच दखल का घेतली नाही असा प्रश्न पडतो. उठावात सामील झालेले आमदार आता आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. त्यांना प्रखर विरोध होईल अशी ठाकरेसमर्थक नेत्यांची जी अपेक्षा होती, ती अखेर फोल ठरली आहे. प्रत्यक्षात या आमदारांचे एखाद्या हिरोसारखे स्वागत झाले. गेल्या महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नाही हे कळून चुकले होते. शिवसेनेला तर त्याचा जबर फटका बसला. तरीही शिवसेना नेतृत्वाला जाग आली नाही याचेच आश्चर्य वाटते. मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले उठावाचे नेते एकनाथ शिंदे सारे राजकारण विसरून तडफेने कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दांडगा अनुभव आणि कुशाग्र बुद्धी त्यांच्या दिमतीला चोवीस तास उपलब्ध आहे. त्याच्या जोरावर नवे सरकार पुढील अडीच वर्षे उत्तमपणे कारभार करणार यात कुठलीही शंका घेण्याचे कारण नाही. सरकारी पातळीवर सारे काही आलबेल होत असले तरी सत्तेवरून पायउतार झालेली महाविकास आघाडी मात्र गाशा गुंडाळण्याच्या दिशेने प्रवास करू लागली आहे. मुळात ही आघाडी केवळ सत्ता बळकावण्यासाठीच अस्तित्वात आली होती. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार करून घेण्यासाठी उचल खाल्ली आणि त्यातूनच अनैसर्गिक अशी महाविकास आघाडी जन्माला आली. हा इतिहास त्यांना येणार्‍या भविष्यकाळात त्रासदायक ठरणार असे दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील उठावानंतरही शिवसेनेच्या पक्षसंघटनेचे नुकसान दिवसेंदिवस वाढतच जात आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे द्रौपदी मुर्मू यांची उमेदीवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या बहुतेक खासदारांनी त्यांनाच समर्थन द्यावे अशी मागणी नेतृत्वाकडे केली आहे. विधानसभेत शिवसेनेचे तारू जसे फुटले तसेच ते संसदेतही विस्कटणार याचीच ही स्पष्ट चिन्हे आहेत. श्रीमती मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असे पत्र शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे यांना पाठवल्यानंतर शिवसेनेचा प्रतिसाद काय होता तर संसदेत पक्षप्रतोद पदी असलेल्या खासदार भावना गवळी यांना हटविण्याचा! हे पाऊल उचलण्याऐवजी श्रीमती मुर्मू यांना समर्थन देण्याची भूमिका अधिकृतपणे घेतली असती तर ते शिवसेना पक्षालाच कदाचित लाभदायक ठरले असते. परंतु अशा आक्रस्ताळी प्रतिक्रियेमुळेच माणसे सोडून जातात हे सत्य अजुन बहुदा शिवसेना नेतृत्वाला उमजलेले नसावे. उठावात सहभागी झालेल्या आमदारांनी सार्‍या खेळखंडोब्याचे खापर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच फोडलेले आहे. आमदारांबरोबरच या पक्षाचे अनेक खासदार देखील राऊत यांच्या बेलगाम वक्तव्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले आहेत. अशा प्रवक्त्यांमुळेच शिवसेनेचा अंत दिसू लागला अशा प्रकारचा निशाणा समाजमाध्यमांमधूनही साधला गेला. इतके होऊनही आपल्या कार्यकर्त्यांची मने का विस्कटली आहेत हे तपासून पाहायला शिवसेना नेतृत्व तयार नाही, याला काय म्हणावे?

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply