पनवेल : वार्ताहर
कोरोना विषाणूचा फैलाव थोपवत स्टेज तीनमध्ये जाणे टाळायचे असेल तर सोशल डिस्टसिंग राखणे अत्यावश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस यांच्या वतीने वारंवार या गोष्टीचा कंठशोष करण्यात येत आहे. असे असले तरीसुद्धा स्वतःला शिकले-सवरलेले म्हटलेल्या वर्गाकडून जर सोशल डिस्टसिंगचा भंग होणार असेल तर या लढाईला काहीही अर्थ राहणार नाही. कोविड-19चा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल तर प्रत्येकाने आपल्या घरात बसणे हा एकमेव आणि कदाचित शेवटचा पर्याय आपल्या हातामध्ये शिल्लक आहे. जनतेच्या कानीकपाळी ओरडून सांगितल्यानंतर सुद्धा अद्यापही ही साधी बाब त्यांच्या लक्षात येत नाही. चीड आणणारी गोष्ट म्हणजे स्वतःला शिकले-सवरलेले समजणारे किंवा ज्यांना उच्चभ्रू म्हणावे अशा लोकांकडूनच लॉकडाऊनला हरताळ फासण्याचे धंदे सुरू आहेत. लॉकडाऊनचे उल्लंघन केले म्हणून मिळालेल्या शिक्षेचे प्रायश्चित्त होण्याऐवजी नागरिकांकडून तोच गुन्हा पुन्हा पुन्हा घडणार असेल तर इतके दिवस राबविले गेलेल्या लॉकडाऊनचा उपयोग कसा होणार हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊन असूनही मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर पडणार्या नागरिकांवर पोलीस कारवाई करत आहेत. त्यामुळे कोविड-19च्या महामारीच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याने गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यासाठीच्या दंडाची रक्कम न्यायालयात भरण्यासाठी येणारे नागरिक न्यायालयाबाहेर गर्दी करताना आढळून येत आहेत. न्यायालयात सोशल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने चार किंवा सहा आरोपींना आत जाण्याची मुभा देण्यात येत आहे. परंतु कारवाई होणार्यांचे प्रमाण पाहता बाकीचे न्यायालयाच्या बाहेर जत्था करून ताटकळत उभे असतात. म्हणजे जो गुन्हा केल्याबद्दल शासन झाले आहे. तोच गुन्हा करताना हे नागरिक पुन्हा एकदा दिसून येत आहेत. यात नक्की चूक कोणाची? पोलिसांनी कारवाई करून न्यायालयात धाडल्यामुळे त्यांची जबाबदारी संपते, तर कधी एकदा दंड भरतो आणि यातून मोकळा होतो अशी नागरिकांची समजूत असते. पण या सगळ्यात लॉकडाऊन थियरीचे मात्र तीन तेरा वाजलेत.