आदिवासी, दलित कुटुंबांना धान्यवाटप
कर्जत ः बातमीदार
नागरी वस्ती आणि गाव असे मिश्रण असलेल्या कोल्हारे ग्रामपंचायतकडून कोरोनावर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायतीने धूर फवारणीसाठी नवीन मशिन खरेदी केली असून औषध फवारणी करतानाच ग्रामपंचायतीकडून सर्व ग्रामस्थांना मास्क तसेच सॅनिटायझर दिले आहे. आदिवासी आणि दलित समाजातील तब्बल 181 कुटुंबांना धान्याचे वाटपही करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीकडून सर्व गावात आणि आदिवासीवाडीमध्ये दवंडी पिटवून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांनी चार अंगणवाड्यांमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा सेविकांना एकत्रित करून त्यांना कोरोनाबद्दल काळजी घ्यावी यासाठी जनजागृती करण्याचे पत्रक देण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत हद्दीमधील कोल्हारे, धामोते, बोपेले गावातील घरोघरी ग्रामपंचायत कर्मचारी पोहचले आणि त्यांनी मास्क तसेच सॅनिटायझरचे वाटप केले. त्यानंतर ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सरपंच शेवंता वळवे, उपसरपंच रामदास हजारे, माजी उपसरपंच राजेंद्र विरले, सदस्य जयवंत हजारे, संचिता कोळंबे, रंजना मिनमिने, विजया हजारे, वंदना पेरणे, स्मिता मोरे, करुणा मोरे, प्रचिती मुंढे यांनी ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर यांच्याकडे धूर फवारणी यंत्र खरेदी करण्याची सूचना केली. ग्रामविकास अधिकारी गायकर यांच्याकडून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांचा प्रस्ताव कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांच्यासमोर ठेवण्यात आला. गटविकास अधिकार्यांनी तत्काळ हा प्रस्ताव मंजूर करून नवीन धूर फवारणी मशिन खरेदीची परवानगी मिळताच नाशिक येथून नवीन मशिन कोल्हारे येथे आणण्यात आले. धूर फवारणी मशीनच्या माध्यमातून कोल्हारे, धामोते, एसटी स्टँड, बोपेले, आगरी समाज सभागृह, चारफाटा, हजारे नगर, कातकरी वाडी आदी भागात फवारणी सुरू आहे. स्वतःचे धूर फवारणी यंत्र आणणारी कोल्हारे ग्रामपंचायत कर्जत तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत आहे.