Breaking News

विकासचक्र पुन्हा फिरणार

कोरोनामुळे गेले अनेक दिवस बंद असलेली उद्योगासह अन्य क्षेत्र पुन्हा एकदा सुरू होत आहेत. माणसाचा जीव सर्वात महत्त्वाचा असला तरी याच माणसाला जगविण्यासाठी विकासाचे चक्र अविरत फिरणे आवश्यक आहे. म्हणून केंद्र शासनाने टाळेबंदीतील काही निर्बंधांमध्ये सूट देऊन शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरसच्या संकटात सापडले आहे. जागतिक महासत्ता अमेरिका तसेच युरोप खंडातील बलाढ्य म्हणून ओळखले जाणारे देशही यातून सुटू शकले नाहीत. गंभीर म्हणजे या महामारीवर अद्याप इलाज सापडला नसल्याने रूग्ण आणि मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. भारतही त्याला अपवाद नाही. सुदैवाने केंद्र सरकारने तातडीने, धडक आणि ठोस कार्यवाही करीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्णय, उपाययोजना केल्या आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कणखर व दूरदर्शी असे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात आपल्या देशाला मिळालेले आहे. म्हणूनच जगातील अनेक देशांत अक्षरश: कीड्यामुंग्यांप्रमाणे लोक मरत असताना तशी वेळ भारतावर आलेली नाही, पण उद्योग-व्यवसायासह सारेच ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम नक्कीच झालाय. कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीनसह अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंग्लंड यांसारख्या विकसनशील राष्ट्रांचीही अर्थव्यवस्था ढासळून अवघ्या विश्वालाच तडाखा बसलाय. असे असले तरी माणसाचा जीव सर्वांत महत्त्वाचा आहे आणि दुसरीकडे त्याच माणसाला जगवायचे असेल, तर काही प्रमाणात निर्बंधांमध्ये शिथिलता आणणे आवश्यक आहे. ते ध्यानात घेत केंद्र शासनाने मार्गदर्शक तत्वे तयार करून अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू ठेवतानाच शेती, उद्योग, शासकीय व काही खासगी कार्यालये आदींना 20 एप्रिलपासून सूट दिली आहे. राज्य शासनानेही नियमावली जारी केली आहे. अर्थात, हे सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच करावे लागणार आहे. भारतासाठी अशी संकटे नवीन नाहीत. यापूर्वीही अशा अनेक नैसर्गिक आपत्ती देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात येत होत्या. महामारीने अनेकांचे जीवही गेलेले आहेत. त्यातून भारतीय जनता तावून सुलाखून निघालेली आहे. कोणतेही संकट हे अनेकदा चांगल्या, वाईट घटना समाजाला देऊन जाते. त्यामुळे सध्या उद्भवलेले कोरोनाचे संकट हे समस्त भारतीयांसाठी एक संकटबरोबरच इष्टापत्तीही ठरू लागल्याचे प्रकर्षाने जाणवते. एरवी नेहमी गजबजून गेलेला देश शांत झाला आहे. एक मोठा धडा यानिमित्ताने सर्वांना मिळालेला आहे. आता बंद असलेले विकासाचे चक्र पुन्हा एकदा सुरू होत आहे. ते फिरले तरच माणूस जगणार आहे. त्यामुळे त्याचे अविरतपणे चालू राहणे त्यावर अवलंबून असलेल्या विविध घटकांसाठी आवश्यक आहे. देशातील जनतेने आजवर संयम दाखवून कोरोनाविरुद्ध लढाईत आपले योगदान दिले आहे. आता नव्याने पुन्हा सुरुवात होत असताना जबाबदारी आणखी वाढली आहे. गेले अनेक दिवस कोलमडलेली वृत्तपत्रसृष्टीही कात टाकत आहे. राज्यात मुद्रित माध्यमांना परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु घरोघरी वृत्तपत्रे वितरित करण्यास मनाई आहे. ते चुकीचे आहे. अशा काळात वृत्तपत्रांमार्फत अचूक व विश्वासार्ह माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी वर्तमानपत्रे घरोघरी जाणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपल्या निर्णयामध्ये बदल करणे आवश्यक आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply