तिघे वाहून गेले; 300 गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली ः प्रतिनिधी
पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. 70 टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकर्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे 300 गावांचा दोन दिवसांपासून संपर्क तुटलेला आहे, तर या पुरात जिल्ह्यातील तीन जण वाहून गेले आहेत.
सहा दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. नदी, नाल्यांना पूर आला असून सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. पर्लकोटा नदीवरील भामरागड-
हेमलकसादरम्यानचा मोठा पूल पाण्याखाली गेला. त्यानंतर वेगाने पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले. बाजारपेठ बुडाली. शुक्रवारी रात्री भामरागडची परिस्थिती कठीण झाली. पर्लकोटा आणि पामुलगौतम नदीच्या पुराने भामरागडला वेढा घातला. बाजारपेठेसह गावाचा बहुतांश भाग, आयटीआय इमारतीसह सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रशासनाने गावातील सुमारे 600 नागरिकांना सुरक्षित हलविले. भामरागडचा वीजपुरवठा आणि
मोबाइलसेवाही पूर्णपणे बंद पडली आहे. यंदा सहाव्यांदा भामरागडला पुराचा फटका बसला आहे. यापूर्वी 1994मध्ये इतका मोठा पूर आला होता. इंद्रावती नदीने लगतच्या छत्तीसगडमध्ये धोक्याची पातळी पार केल्याने भामरागडला त्याची तीव्रता सहन करावी लागण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंग आणि पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शनिवारी हेलिकॉप्टरद्वारे भामरागडला भेट देण्याचा निर्णय घेतला. दोन्ही अधिकारी भामरागडला पोहचले. पुरामुळे हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टर उतरू शकले नाही. कोठी या दुर्गम भागातील पोलीस ठाण्यातही पुराचे पाणी शिरले. या भागाचीही अधिकार्यांनी पाहणी केली.
भामरागड-आलापल्ली या 65 किमीच्या मार्गावरील सर्व पूल पाण्याखाली गेल्याने तालुक्यांमधील 125 गावांचा संपर्क तुटला आहे. पाल नदीला पूर आल्याने दिवसभर गडचिरोलीचा नागपूरशी संपर्क तुटला होता. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीला पूर आला आहे. आष्टीलगतचा पूल पाण्याखाली गेल्याने अहेरी, एटापल्ली, भामरागड, मूलचेरा, सिरोंचा या पाच तालुक्यांचा चंद्रपूरशी तर आलापल्ली-आष्टीदरम्यान चौडमपल्ली नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद होता. शिवणीजवळच्या पुलावर सायंकाळी पाणी आल्याने पाच तालुक्यांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे.