Breaking News

जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसला, देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधार्यांवर हल्लाबोल

नागपूर ः प्रतिनिधी

केवळ सत्तेचा माल खाण्यासाठी आणि भाजपला दूर ठेवण्यासाठी विश्वासघात आणि बेईमानी करून राज्यात हे सरकार सत्तारूढ झाले आहे. जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार, अशीच या सरकारची अवहेलना राज्यभर सुरू आहे,  पण जनादेशाच्या पाठीत खंजीर खुपसणारे सरकार फार काळ चाललेले नाही, हा या देशाचा इतिहास सांगतो, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी

(दि. 2) नागपूर जिल्ह्यातील आमडीफाटा आणि धानला येथील सभांमध्ये बोलताना सत्तारूढ सरकारवर हल्लाबोल केला.

निवडणुकांच्या काळात अवकाळग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना करीत होती, तर 50 हजार रुपये हेक्टरी मदतीची मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी करीत होती, पण आता शेतकर्‍यांना कोणतीही मदत देण्यास हे सरकार सपशेल नकार देत आहे. राज्यात आपण काळजीवाहू मुख्यमंत्री असताना 10,000 कोटी रुपये शेतकर्‍यांसाठी मंजूर केले होते. आज शेतकर्‍यांची मोठी फसवणूक होत आहे. आज पुन्हा नागपूर आणि परिसरात गारपीट झाली. त्यांनाही मदत दिली पाहिजे. एकीकडे अवकाळग्रस्तांना मदत मिळत नसताना दुसरीकडे फसव्या जाहिरातीसारखी कर्जमाफी दिली जात आहे. आमच्या काळात 2001 ते 2017पासूनचे कर्ज माफ केले गेले. यांच्या सरकारने केवळ दोन वर्षांचे कर्ज माफ केले. सप्टेंबर 2019ची अट टाकून अवकाळग्रस्तांना मदतीपासून वंचित ठेवले आणि त्यातही अटी-शर्ती लागू, असे सांगून जीआर काढला. ही एका लबाड सरकारने केलेली मोठी लबाडी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

एकीकडे राज्यात मलाईदार खात्यांसाठी भांडाभांडी होत असताना शेती खाते कुणाकडे जावे यासाठी मात्र कुणीही आग्रही दिसून येत नाही. यातूनच त्यांचे शेतकरीप्रेम दिसून येते. केंद्रातील मोदीजींच्या सरकारने अनेक योजना आणल्या आणि आज त्याचा देशाला लाभ होत आहे. शेतकरी सन्मान निधीसारख्या योजनांमुळे शेतकर्‍यांना मोठा लाभ होत आहे. गेल्या काळात अनेक महत्त्वाची खाती ही विदर्भातील मंत्र्यांकडे होती. चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना केवळ बिल भरले नाही म्हणून एकाही शेतकर्‍याची वीज कापण्यात आली नाही. कायम शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी आपल्या सरकारने काम केले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, सत्ताधारी पक्षात असतानाही शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्याचप्रमाणे आता भाजपही सेनेला त्यांच्या आश्वासनांची वेळोवेळी जाणीव करून देत आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply