Breaking News

नेरळ पोलिसांची धडक कारवाई; संचारबंदीत फिरणार्‍या वाहनचालकांना दंड; पावणेदोन लाखांचा महसूल गोळा

कर्जत ः बातमीदार

कोरोनामुळे संचारबंदी जारी असून शासनाच्या आदेशाने अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहनांना पेट्रोल देऊ नये, असे आदेश आहेत. तरीही अनेक वाहने रस्त्यावर दिसत असून अशा वाहनांवर रायगड पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिले आहेत. त्यानुसार नेरळ पोलिसांनी एप्रिल महिन्यातील 19 दिवसांत एक लाख 80 हजारांचा महसूल अवैध वाहतूक करणार्‍या वाहनचालकांकडून गोळा केला आहे. त्यात नेरळ पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसांनी तब्बल दीड लाखांच्या महसुली उत्पन्नाचा टप्पा गाठला आहे.

सोमवारीही पोलिसांनी नेरळ बाजारपेठेमध्ये अवैध वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना ताब्यात घेऊन तब्बल 100 गाड्या पार्किंगमध्ये लावल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक टी. एन. सावंजी हे स्वतः उभे राहून कारवाई करीत आहेत. नेरळ पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक अविनाश पाटील यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

रायगड जिल्हा पोलिसांकडून यापूर्वी वाहतूक शाखेचा कारभार स्वतंत्रपणे पाहिला जात होता, पण लॉकडाऊनमुळे वाहतूक शाखेचे कर्मचारी हे अन्य ठिकाणी जाऊ शकत नसल्याने ते 31 मार्च रोजी असलेल्या पोलीस ठाण्यात राहून तेथील वाहतूक शाखेचे कामकाज पाहू लागले. जिल्हा पोलीस प्रमुखांनी आदेश दिल्याने पोलिसांनी अवैध वाहतूक करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई सुरू केली .त्याचवेळी पेट्रोलपंप येथेदेखील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणालाही पेट्रोल देण्यास बंदी आदेश असतानाही वाहने मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. हे पाहून नेरळ पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये दुचाकी फिरताना दिसली की लगेच कारवाई करताना पहिल्याच दिवशी 72 वाहने पोलीस ठाण्यात जमा करून त्यांना लॉकडाऊन संपल्यावर वाहने नेण्यास सांगितले. त्यामुळे सर्वत्र पोलिसांचा धाक असल्याचे दिसून आले होते.

दररोज वाहने रस्त्यावर फिरत असल्याने वाहतूक शाखेने कारवाई करताना आतापर्यंत मागील 19 दिवसांत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक करणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यातून पोलिसांनी तब्बल 51 लाखांचा महसूल गोळा केला आहे. नेरळ पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने तब्बल 800 केसेस करून अवैध वाहतूक करणार्‍यांचे कंबरडे मोडले आहे. नेरळ वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील आणि पोलीस हवालदार कराळे हे दुचाकी गाडीवर कारवाई करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन करीत नाहीत. त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने तब्बल एक लाख 80 हजारांचा महसूल गोळा केला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply