Breaking News

डॉक्टरांना दिलासा

देशावर कोरोनाचे संकट घोंघावू लागले तेव्हा प्रारंभीपासून सर्वच आरोग्य कर्मचारी झोकून देऊन या घातक साथीला अटकाव करण्यासाठी जुंपले आहेत, पण दुर्दैवाने सुरुवातीपासूनच या आरोग्य कर्मचार्‍यांना कुठे ना कुठे हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. केंद्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशामुळे मात्र निश्चितपणे त्यांना दिलासा मिळाला असेल.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचे संकट देशात अवतरल्यानंतर देशभरात लागू झालेल्या लॉकडाऊनचा बुधवारी 29वा दिवस होता. देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या एव्हाना 20 हजारांच्या समीप पोहचली आहे. एकीकडे कोरोना बळींची संख्या 600च्या पुढे गेली आहे, तर या साथीतून बरे होणार्‍यांचे प्रमाणही वाढून 17.5 टक्के झाले आहे. एकीकडे लॉकडाऊनमध्ये खबरदारी घ्या, घरीच थांबा, असे वारंवार सांगूनही देशभरात सगळीकडेच लोक भाजीपाल्याच्या खरेदीच्या निमित्ताने वा अन्य कारणांनी घराबाहेर पडतच आहेत, तर दुसरीकडे लोकांच्या मनात कोरोनाविषयी प्रचंड भीती घर करून आहे याचे दर्शन घडवणार्‍या घटनाही घडत आहेत. या भीतीतून लोक किती क्रूर आणि निर्दयी होऊ शकतात याचे दर्शन नुकतेच चेन्नईतील एका घटनेतून घडले. रुग्णांची सेवा करताना तेथील न्युरोसर्जन डॉ. सायमन यांना कोरोनाची बाधा झाली. अखेरचे दोन आठवडे ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांचा अशा तर्‍हेने कोविड-19शी झुंजून मृत्यू व्हावा याबद्दल त्यांच्या सहकारी डॉक्टरांना दु:ख होतेच. परंतु त्यांच्या दफनविधीच्या वेळी जमावाकडून ज्या तर्‍हेचा विरोध झाला त्याने या सहकार्‍यांची मने विषण्ण झाली. आपल्या भागात कोरोनाबाधित डॉक्टरच्या मृतदेहाचे दफन नको म्हणून जमावाने त्यांच्या सहकार्‍यांच्या वाहनावर दगडफेक केली. स्वत:च्या बचावासाठी या सहकार्‍यांना मृतदेह मागेच टाकून पळ काढावा लागला. अखेर मध्यरात्र उलटून गेल्यावर पोलिसांच्या संरक्षणात सहकार्‍यांनी दफनविधी कसाबसा उरकला. या घटनेचे वृत्त देशभरात पसरताच वैद्यकीय क्षेत्रामध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविकच होते. स्वत:चे व स्वत:च्या कुटुंबीयांचे आरोग्य यांचा विचार न करता देशभरात अनेक डॉक्टर्स दिवसरात्र झोकून देऊन रुग्णसेवेला जुंपलेले आहेत. प्रारंभी त्यांच्यासाठी स्वसंरक्षणासाठीची किट्सही पुरेशी नव्हती. तसेच अनेक ठिकाणी रुग्णांची तपासणी करून खातरजमा करण्यासाठी गेलेल्या वैद्यकीय कर्मचार्‍यांवर दगडफेक वा हल्ले झाले, परंतु तरीदेखील कोरोनाबाधितांची रुग्णसेवा डॉक्टर व आरोग्य कर्मचारी करीतच राहिले, मात्र चेन्नईच्या घटनेनंतर हे हल्ले रोखण्यासाठी सरकारने अध्यादेश काढावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आली. दुर्दैवाने एखाद्या डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याच्यावर किमान सन्मानाने अंत्यसंस्कार केले जावेत, अशीही मागणी करण्यात आली. केंद्र सरकारने या मागण्यांची तत्परतेने दखल घेतली आणि साथीच्या रोगांसंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती सुचवणारा अध्यादेश तातडीने काढण्यात आला. आरोग्यसेवेशी संबंधित कुणाही व्यक्तीवर हल्ला केल्यास आता कठोर कारवाईला तोंड द्यावे लागणार आहे. अशा हल्लेखोरांना 50 हजार रुपयांपासून दोन लाखांपर्यंतचा दंड भरावा लागेल. तसेच अशा प्रकरणांतील आरोपींना तीन महिन्यांपासून पाच वर्षांपर्यंतच्या काळासाठी कैदही होऊ शकेल. कोरोना प्रादुर्भावाच्या या संकटकाळात कोविड-19च्या विरोधात लढणार्‍या प्रत्येक आरोग्य कर्मचार्‍याचे संरक्षण करण्यास आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत हे दर्शवणारा हा अध्यादेश आहे. त्यांच्या संरक्षणाच्या संदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही, हा पंतप्रधान मोदींनी दिलेला निर्वाळा निश्चितच आपल्या कोविड योद्ध्यांना दिलासा देऊन जाईल.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply