Breaking News

टेरेसवरील गर्दीवरही आता ड्रोनची नजर

इमारतींमध्ये संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याने पोलिसांचे पाऊल

पनवेल : बातमीदार – कोरोना विषाणू प्रार्दुभाव काळात शहरातील मोठ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकार्‍यांना सहनिबंधकांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार गृह संकुलातील दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागाजवळ साडेबारा टक्के योजनेअंर्तगत बांधण्यात आलेल्या छोट्या इमारतींच्या छतावर सकाळ-संध्याकाळ जमणार्‍या रहिवाशांच्या गर्दीवर आता पोलीस ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रात अशा प्रकारच्या नोंदणीकृत नसलेल्या दोन ते अडीच हजार छोट्या इमारती आहेत.

नवी मुंबईत शहरी, ग्रामीण आणि झोपडपट्टीयुक्त वसाहत आहे. टाळेबंदीच्या काळात शहरी भागातील रहिवासी पोलिसांच्या भीतीने का होईना संचारबंदीचे काटेकोर पालन करीत आहेत. ग्रामीण भागातील सत्रे ही त्या त्या गावातील ग्रामस्थ मंडळाने हाती घेतली असून गावाच्या चारही बाजूला बांधण्यात आलेल्या बेकायदेशीर इमारतीत राहणार्‍या हजारो रहिवाशांवर गावकर्‍यांनी वचक ठेवला आहे. त्यामुळे हे रहिवासी गेले 26 दिवस घरात कोंडून आहेत. प्रत्येक गावाच्या बाजूला सिडकोने प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या साडेबारा टक्के योजनेअंर्तगत काही छोट्या इमारतींची निर्मिती झाली आहे.

नवी मुंबईत एकूण 29 गावे आहेत. यातील 90 टक्के गावांजवळ शंभर, दोनशे, चौरस मीटर क्षेत्रफळावरील इमारती ह्या छोट्या इमारती म्हणून गणल्या गेल्या आहेत. ह्या इमारतींची सहकारी गृहनिर्माण नोंदणी केली जात नाही. भूखंड मालकांनी यातील छोटी घरे एकतर विकलेली आहेत किंवा भाडेपट्टयाने दिलेली आहेत. त्यामुळे या संपूर्ण इमारतीवर भूखंड मालकांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. गेले अनेक दिवस घरात बसून कंटाळेले रहिवासी या छोट्या इमारतीतील छतांवर सकाळ-संध्याकाळ एकत्र येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शहरातील काही छोट्या इमारतींतही असे प्रकार आढळून आल्याचे दिसून येते.

नेरुळ येथील एका शासकीय इमारतीवर तर या काळात चक्क मसाले व पापड पदार्थ तयार करण्याचे काम सुरू आहे. रहिवाशांच्या एकत्र येण्याने सामाजिक अंतराचे नियम या छोट्या इमारतींवर धाब्यावर बसविले जात आहे. शहरातील अशा प्रत्येक इमारतीवर जाऊन पाहणी करणे पोलिसांना शक्य नाही. त्यामुळे अशा काही इमारतींच्या छतावरील गर्दी टिपण्याचे काम पोलीस ड्रोनद्वारे करणार आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडे तीन ड्रोन कॅमेरे आहेत. इमारतीच्या छतावर एकत्र येणे, महिलांचे खेळ आयोजित करणे, हे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास कारणीभूत होऊ शकते. छतावर अशा प्रकारे एकत्र आल्यास कारवाई केली जाईल.

– राजकुमार व्हटकर, सहपोलीस आयुक्त, नवी मुंबई

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply