अनधिकृत बांधकामप्रकरणी आमरण उपोषणाचा इशारा
कर्जत : बातमीदार
पोशीरमधील अनधिकृत बांधकामावर आदेश मिळूनही कारवाई न झाल्याने तक्रारदार महिलेने सरपंच व ग्रामसेवक यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. प्रशासकीय आदेशानंतरही पोशीर ग्रामपंचायतीने अनधिकृत बांधकामावर कारवाईस नकार दिला आहे. ग्रामपंचायतीच्या या हेकेखोर भुमिकेमुळे हवालदिल झालेल्या तक्रारदार महिलेने अखेर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे ग्रामविकास अधिकारी अशोक रौदळ यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
हे बांधकाम (कुंपणभिंत) बेकायदेशीर असून, त्यामुळे वहिवाटीचा रस्ता बंद झाला आहे. अशी लेखी तक्रार ठाकूबाई माळी या विधवा महिलेने पोशीर ग्रामपंचायतीकडे वारंवार केली होती. मात्र नोटीस काढूनही ग्रामपंचायतीने कारवाई केली नाही. सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी कारवाईस नकार दिल्याने या महिलेने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे फेब्रुवारी 2018 मध्ये तक्रार दाखल केली होती. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार विहित चौकशीची कार्यवाही पूर्ण करून सदर बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. मात्र आदेश मिळून तीन महिने झाले, तरी सरपंच व ग्रामविकास अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
मंडळ अधिकार्यांनी आमच्यासमक्ष चौकशी केली नाही, असा बहाणा ग्रामपंचायत कार्यकारिणीने आपल्या ठरावामध्ये केला आहे, मात्र मंडळ अधिकारी यांच्या जबाब पंचनाम्यावर पोशीरचे उपसरपंच संतोष राणे यांच्यासह अन्य दोन सदस्य तसेच पोलीस पाटील राहुल राणे, तंटामुक्ती अध्यक्ष कांता हाबळे व अन्य अनेक पंचांच्या सह्या असल्याचे निदर्शनास आले आहे.
असे असताना मंडळ अधिकार्यांचा पंचनामा चुकीचा असल्याचा दावा पोशीर ग्रामपंचायतीने केला आहे. त्यामुळेच तक्रारदार महिलेने रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे ग्रामविकास अधिकारी अशोक रौदळ आणि सरपंच हरिचंद्र निरगुडा यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात असलेल्या गावठाणाचे नियोजन व रक्षण केले पाहिजे. पण पोशीर ग्रामपंचायतीने तर बेकायदेशीर कुंपणभिंत वाचवण्याचा ठेका घेतला आहे. यामागे केवळ मतांसाठीचे राजकारण हेच कारण आहे. त्याविरोधात मी आमरण उपोषण करणार आहे.
-ठाकूबाई माळी, तक्रारदार, पोशीर, ता. कर्जत
याबाबत ग्रामपंचायतीला विचारात न घेता पंचनामा केला असून, मंडळ अधिकार्यांनी पुन्हा आमच्यासमक्ष पंचनामा करावा, अशा आशयाचा ठराव पोशीर ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेतला आहे.
-अशोक रौदल, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत-पोशीर
आदेश प्राप्त होऊनही पोशीर ग्रामपंचायत कारवाई करणार नसेल तर त्यांनी अर्जदार व प्रशासन यांस तसे लेखी कळवावे, म्हणजे पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल, उगाच प्रशासनाचा वेळ वाया घालवू नये.
-अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत