मनोहर पर्रिकर यांचे निधन सार्यांनाच चटका लावून जाणारे ठरले आहे. अल्पायुषी ठरलेल्या या महान नेत्याने मिळालेल्या आयुष्यात देशसेवा आणि समाजसेवा हेच ब्रीद उराशी बाळगले आणि ते सार्थही करून दाखविले. पर्रिकरांच्या निधनाने भारताने एक कर्तबगार नेता कायमचा गमावला आहे. त्यांची उणीव नेहमीच सर्वांना जाणवत राहील.
देशाचे माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देश एक महान कर्तबगार नेत्यास कायमचा मुकला आहे. गेले वर्षभर पर्रिकर हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्या आजारावरही त्यांनी मोठ्या जिकीरीने मात केली होती, पण दुर्दैवाने नियतीने डाव साधला आणि एक कर्तबगार नेता काळाच्या पडद्याआड गेला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मनोहर पर्रिकर हे कामात व्यस्त होते. मृत्यूनंतर आणि हयात असताना देखील मनोहर पर्रिकर यांच्याविषयी सर्वसामान्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. कारण त्यांचे राहणीमान अतिशय साधे आणि सर्वसामान्यांना भावेल असेच होते. मुख्यमंत्री असो वा देशाचे संरक्षण मंत्रिपद. या दोन्ही पदांवर काम करताना मनोहर पर्रिकर यांनी कधीही बडेजाव केला नाही. उलट अतिशय साधेपणाने राहत त्यांनी देशवासीयांमध्ये वेगळेच स्थान निर्माण केले. वास्तविक एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची ऐट काय असते हे सांगायला कुणाचीही गरज भासणार नाही. देशात अनेक राज्ये आहेत. तेथील मुख्यमंत्र्यांच्या राहणीमानाच्या सुरस कथा आपण सारे ऐकत असतो, पण त्याला मनोहर पर्रिकर हे अपवादच ठरले. नेहमीच साध्या पोषाखात वावरणे हा त्यांचा खाक्याच होता. सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध होऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे हे ब्रीदच त्यांनी उराशी बाळगले आणि अखेरच्या श्वासापर्यंत ते तसेच प्रामाणिक राहिले. मुंबईतून आयआयटीचे इंजिनिअरिंगची पदवी संपादित केलेल्या पर्रिकरांनी नोकरी, व्यवसायात न अडकता थेट राजकारणात प्रवेश करून मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री अशी पदे भूषवून त्या पदांना वेगळीच प्रतिमा निर्माण करून दिली. लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार घडले. आपल्या संघ पार्श्वभूमीविषयी पर्रिकर आजही अभिमानाने बोलतात. गोव्याच्या विकासात पर्रिकर यांचा सिंहाचा वाटा आहे. संरक्षण मंत्री असतानाही पर्रिकरांनी आपल्या राहणीमानात तसूभरही फरक केला नाही. उलट ज्या वेळी कार्यभार स्वीकारायचा होता त्या वेळी ते साध्या रिक्षेमधून संरक्षण मंत्रालयात गेले. संरक्षण खात्यात अनेक आमूलाग्र बदलही त्यांनी घडवून आणले. गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला वन रँक, वन पेन्शन ही योजनाही पर्रिकरांच्याच काळात कार्यरत झाली. उरी सेक्टर येथे पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची मोर्चेबांधणी पर्रिकरांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आली. म्यानमार येथेही दहशतवाद्यांचा तळ निपटण्यासाठी पर्रिकरांनीच लष्कराला अनुमती दिली. अशी कितीतरी उदाहरणे त्यांच्याशी निगडित आहेत. भाजपशी ते एकनिष्ठ होते. मोदींना पंतप्रधान करा, अशी आग्रही मागणी करण्यात पर्रिकरांचाच पुढाकार होता. पर्रिकर हे खूप कमी आयुष्य जगले, पण ते सारे आयुष्य त्यांनी देश आणि समाजसेवेसाठी सार्थकी लावले हे कुणीही नाकारू शकणार नाही. अशा महान कर्तबगार नेत्यास भावपूर्ण आदरांजली.