पनवेल : वार्ताहर
एपीएमसीच्या फळ मार्केटमधील कलिंगडच्या व्यापार्याकडे हिशेब तपासणीस म्हणून कामाला असलेल्या तरुणाने कलिंगड खरेदी विक्रीच्या व्यवसायातील तब्बल एक कोटी 16 लाख 84 हजार रुपयांचा अपहार करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुजफ्फर मोहम्मद फ्रुटवाला असे आरोपीचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार व्यापार्याचे नाव राजाराम माने असे असून ते एपीएमसी मार्केटमध्ये जहांगीर मेराज शेख यांच्यासह कलिंगड विक्रीचा व्यवसाय करतात. कलिंगड खरेदी विक्रीचे व्यवहार पाहण्यासाठी त्यांनी आरोपी मुजफ्फर मोहम्मद फ्रुटवाला याला कामाला ठेवले होते, मात्र आरोपी मुजफ्फर फ्रुटवाला याने 2018 मध्ये मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालावधीत शेतकर्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने पार्टनर जहांगीर शेख यांच्याकडून वेळोवेळी लाखो रुपयांची रक्कम घेतली.
मात्र त्याने शेतकर्यांना त्यांचे पूर्ण पैसे न देता, त्यातील काही रक्कमच त्याने शेतकर्यांना दिली, तसेच उर्वरित रक्कम त्याने आपल्या बँक खात्यात मनी ट्रान्स्फरच्या माध्यमातून जमा केली. अशा पद्धतीने मुजफ्फर याने तब्बल एक कोटी 16 लाख 84 हजार रुपयांचा अपहार केला. दरम्यान, काही व्यापार्यांकडून कमी पैसे मिळत असल्याचे फोन येऊ लागल्यानंतर व्यापारी राजाराम माने यांनी मुजफ्फरकडे हिशेबाबाबत विचारणा केली असता, त्याने व्यापार्यांकडून पूर्ण पैसे आले नाहीत, पूर्ण पैसे आल्यानंतर रमजान ईदनंतर हिशेब देण्याचे कबूल केले. त्यानंतर त्याने मुंब्रा येथे आपल्या घरी पलायन केले. ईदनंतर देखील त्याने हिशेब देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे राजाराम माने यांनी मुंब्रा येथे जाऊन त्याच्या वडिलांना सर्व माहिती दिल्यानंतर मुजफ्फर याने कलिंगडच्या गाड्या परस्पर काही व्यापार्यांना विकल्याचे व हिशेबामध्ये अफरातफर केल्याचे कबूल केले, तसेच त्याने मार्केटमध्ये येऊन हिशेब देण्याचे कबूल केले, मात्र अद्यापपर्यंत त्याने हिशेब न दिल्याने अखेर राजाराम माने यांनी त्याच्या विरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.