Breaking News

कोकणच्या भूमीतील होलिकोत्सव

कोकणातला गौरी-गणपतीनंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी म्हणजेच शिमगा. या सणाच्या निमित्ताने मुंबईकर चाकारमानी पुन्हा गावाच्या दिशेने कुच करतात. कोणत्याही परिस्थितीत गावी पोहोचण्याची त्यांची धडपड सुरू असते. खरं म्हणालं तर कोकणी माणसाला गावी जाण्याचा फक्त बहाणा लागतो. मग तो कुठलाही असो. गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि असे सणासुदीचे दिवस तो कसा विसरेल? होळीसाठी गावी कोणत्या दिवशी आणि कसे जायचे याची तजवीज त्याने आधीच केलेली असते आणि त्याप्रमाणे तो गाव गाठतोच.

कोकणात विशेषतः फाल्गुन पौर्णिमेच्या दिवसापासून पुढे सात दिवस होलिकोत्सव साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी घरी गोडधोड, त्यात प्रामुख्याने पुरणपोळ्यांचे जेवण केले जाते. सायंकाळी गावातील सर्व लहान-थोर मंडळी एकत्र जमतात आणि आधीच हेरून ठेवलेल्या सरळसोट अशा आंब्याच्या झाडाकडे मोर्चा वळवतात. ते झाड होळीसाठी योग्य आहे हे निश्चित झाल्यावर त्यावर कुर्‍हाड चालवून ते तोडले जाते. या वेळी झाडाचा मालक काहीही बोलत नाही. कारण देवाच्या कामासाठी झाडाचा वापर होत असताना नाही कसे म्हणणार? ढोल-ताशांच्या गजरात हे झाड तोडले जाते आणि होळी पेटविण्याच्या ठिकाणी म्हणजे चवाट्यावर ते आणले जाते. हे झाड आणताना दोन गट तयार केले जातात आणि ‘रस्सीखेच’ या क्रीडा प्रकाराप्रमाणे दोन्ही बाजूने ते ओढले जाते. यात जो गट सरस ठरतो, तो ते झाड उचलून चवाट्यावर आणून तेथील खड्ड्यात ते पुरतो. हे करण्यापूर्वी झाडाच्या बुंध्याकडील साल काढली जाते आणि वरच्या बाजूच्या फांद्याही छाटल्या जातात. फक्त शेंड्याकडे काही फांद्या आणि पाने शिल्लक ठेवली जातात. या शेंड्यावर सफेद निशाण लावून आणि तोडलेल्या फांद्या, पाला बुंध्याभोवती वरपर्यंत बांधून ते झाड खड्ड्यात घट्ट उभे केले जाते. त्याला पाच नारळांचे तोरण बांधले जाते आणि चारही बाजूने गवत लावले जाते. झाडासमोर देवाचा दगड ज्याला ‘होळदेव’ म्हणतात, तो ठेवला जातो. त्या दगडासमोर प्रत्येक घरातून आणलेला नारळ ठेवून होळदेवाला गार्‍हाणे घातले जाते. त्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात होळी पेटवून मोठमोठ्याने ‘बोंब’ मारत शिमगा केला जातो. होळीला अर्पण केलेले नारळ नंतर बाहेर काढून त्याची शिरवणी करून प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो. रोज सायंकाळी सात दिवस होळी पेटवून असा शिमगा केला जातो. या सात दिवसांत गावातील बालगोपाळ मंडळी आपल्यातील एकाला स्त्रीवेष परिधान करायला लावून (‘कोळीण’ किंवा ‘नाच्या’ म्हणतात) घरोघरी नाचत फिरतात. त्या वेळी घरातील मंडळी निरंजन, हळद-कुंकू असलेली तळी आणून समोर ठेवतात. ती तळी उचलून ही कोळीण गाण्याच्या ठेक्यावर ताल धरून नाचते आणि सारे तिला उत्स्फूर्त साथ देतात. या तळीत बिदागी ठेवल्यावर ती उचलून सर्व मंडळी पुढच्या घराकडे रवाना होतात. सतत सात दिवस हा खेळ झाल्यावर शेवटच्या दिवशी होळीवर धुळीचा मारा केला जातो आणि

एकमेकांना गुलाल लावून धुळवड साजरी केली जाते. विशेषतः फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटविल्यानंतर दुसर्‍या दिवशी काही मोजकी मंडळी जंगलात रानडुकरांच्या शिकारीला जातात. शिकार मिळाली की ती होळीसमोर आणून दाखविली जाते आणि नंतर तेथेच सर्वांना बोलवून रात्री जेवणाची व्यवस्था केली जाते. या वेळी घराघरातून भाकर्‍या मागविल्या जातात. भात मात्र बाहेरच शिजवला जातो. आसपासच्या गावातील लोकांनाही जेवणाचे आमंत्रण दिले जाते. या शिकारीनंतर शेतीच्या पूर्वतयारीची कामे खर्‍या अर्थाने सुरू होते. जंगलात जाऊन लाकडे तोडणे आणि शेतजमीन भाजणीसाठी आवश्यक असलेला पालापाचोळा गोळा करणे, गवत कापणे अशा लागवडीच्या कामाला प्रारंभ होतो. म्हणूनच याला लागवडीची शिकार म्हणतात. या शिकारीनंतर जमीन भाजणे, गुरांसाठी गवत गोळा करणे, सरपणासाठी लाकडांची आणि गोवर्‍यांची बेगमी करणे अशा कामांना दमदारपणे सुरुवात होते. सतत सात दिवस होळी पेटविल्यानंतर सारे काही थांबवून येणार्‍या चैत्राच्या पौर्णिमेला गावकरी पुन्हा सायंकाळी एकत्र येतात. होळीसाठी उभे केलेले ते झाड तोडून पेटविले जाते आणि शेतीच्या कामाला खरा जोर येतो.

सिंधुदुर्गाच्या काही गावांत अशी सात दिवस होळी साजरी होत असताना अन्यत्र आणि प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या पालखींची गावभर वाजत गाजत निवडणूक काढण्याची प्रथा आहे. या वेळी ढोल-ताशा, मृदुंगाच्या तालावर पालखी खांद्यावरून घेऊन नाचविली जाते. हा उत्सव काही ठिकाणी 10 तर काही ठिकाणी 15 दिवस सुरू असतो.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होळीचा सण पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा केला जातो. या दोन्ही जिल्ह्यांत होळी साजरी करण्याच्या पद्धतीत थोडाफार फरक आहे. सिंधुदुर्गात होळीच्या पूर्वसंध्येला गावाजवळचे आंब्याचे झाड किंवा माडाचे झाड, पोफळीचे झाड निवडले जाते. होळीसाठी कुठले झाड वापरायचे याचीही प्रत्येक गावाची परंपरा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या होळीसाठी पोफळीचे झाड वापरतात. मालवण देऊळवाड्यातील नारायण मंदिरासमोरील होळीसाठी माडाचे झाड तर घुमडे गावातील होळीसाठी आंब्याचे झाड वापरले जाते. निवडलेल्या झाडाची विधिवत पूजा करून ते झाड तोडून वाजतगाजत मिरवणुकीने ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर आणले जाते. मंदिरासमोर आदल्या वर्षीच्या होळीच्या झाडाचा खुंट असतो. तो बाहेर काढला जातो. त्या ठिकाणी नवीन झाडाचा ओंडका उभारला जातो. त्यावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि नारळ बांधला जातो. त्या भोवती सुकलेला पालापाचोळा, काटक्या रचून होळी तयार केली जाते. त्यानंतर होळीचे पूजन करून नैवेद्य दाखवला जातो आणि खास मालवणी पद्धतीने गार्‍हाणे घातले जाते. गावकरी होळीला नारळ अर्पण करतात आणि नवस फेडतात. होळीनंतर पाच दिवस ग्रामदैवताचे निशाण गावातील प्रत्येक घरी जाते. तेथे पाटावर ठेवून त्याची पूजा केली जाते, नैवेद्य दाखवला जातो. पाचव्या दिवशी निशाण देवळाकडे येते. तिथे त्याची पूजा करून सर्व गावाला प्रसाद वाटला जातो. प्रत्येक गावाच्या प्रथा, परंपरा थोड्याफार प्रमाणात वेगळ्या असतात. हनुमान जयंतीला होळीसाठी देवळासमोर उभारलेला ओंडका तोडला जातो.

रत्नागिरीतही साधारणपणे अशाच पद्धतीने होळी साजरी केली जाते, मात्र खेळे जाणे आणि पालख्या नाचविण्याची प्रथा रत्नागिरीत आढळते. खास गणवेश परिधान केलेले गावागावांतील खेळे होळीआधी साधारण चार-पाच दिवस घराबाहेर पडतात. विशेष म्हणजे हे खेळे अनवाणी असतात. शेजारील गावातील प्रत्येक घरात डफ, टाळ-मृदुंगाच्या तालावर नाचल्यानंतर होळीच्या पूर्वसंध्येला हे खेळे माघारी परततात. घराच्या अंगणात नाचणार्‍या खेळ्यांच्या चमूला ओवाळणी घालण्याची प्रथा आहे. त्यातून जमा होणार्‍या पैशातून पोस्त (पार्टी) केली जाते. त्यातील काही रक्कम खेळ्यांच्या गणवेशासाठी वापरली जाते, तर काही रकमेची बचत केली जाते.

कोकणातील होळीसारख्या सणांना हल्ली पर्यटनाची जोड दिली जात असल्याचे चित्र दिसते. पारंपरिक होळीची मजा अनुभवायची असेल, तर कोकण हा चांगला पर्याय आहे. सिंधुदुर्ग किल्ला, चिवला, तारकर्ली, देवबाग असे सागर किनारे, देवबाग बीचवरील वॉटर स्पोर्ट्स, डॉल्फीन सफारी, पक्षी निरीक्षणासाठी धामापूर तलाव, सुवर्ण गणेश मंदिर, घुमडे गावातील घुमडाई मंदिर, आंगणेवाडीतील मंदिर, खरेदीसाठी मालवण बाजारातही पर्यटनाचा आनंद घेता येईल. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, गुहागर, आंजर्ले, हर्णे-मुरूड आदी ठिकाणी पर्यटनाच्या सुविधा आहेत.

-साभार : दीपक परब

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply