मुरूड : प्रतिनिधी
खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेले कोळी बांधव होळी सण साजरा करण्यासाठी घरी परतत आहेत. या वेळी आकर्षक सजावट केलेल्या बोटी किनार्यांवर सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र आहे.
कोकणातील किनारपट्टी भागात मासेमारी या प्रमुख व्यवसायावर कोळी बांधवांचे जीवन अवलंबून आहे. खोल समुद्रात मासळी पकडून ती मुंबईतील ससून डॉक येथे विकून कोळी समाज आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत असतो. कोळी बांधवांचा आवडता सण जवळ आल्याने खलाशी मंडळी आवर्जुन घरी येत असतात. सध्या मुरूड तालुक्यातील नांदगाव, राजपुरी, एकदरा, आगरदांडा, दिघी येथे कोळी लोक परतत आहेत. मुंबईतून निघताना कोळी बांधव बोटी विविध रंगीबेरंगी कापडांनी सजवितात. त्याला फुले, पताका, झेंडे यांची जोड देतात. ही मंडळी आपली पारंपरिक वेषभूशा परिधान करून प्रथम खंदेरी येथे वेताळ देवाचे दर्शन घेऊन व त्याची पूजा-अर्चा करून येणार्या दिवसांत चांगली मासळी मिळावी व समुद्रापासून आपले सदैव रक्षण व्हावे अशी वेताळ देवापुढे प्रार्थना करतात. सालाबादप्रमाणे यंदाही मुरूड येथील चंद्रकांत सरपाटील यांच्यासह तालुक्यातील समस्त कोळी बांधवाच्या नौका वेताळ देवाचे दर्शन घेऊन घरी परतल्या आहेत. त्यामुळे किनार्यांना अनोखा साज चढला आहे.