Breaking News

आत्मनिर्भरतेचे पर्व सुरू

कोरोनाचे संकट इतके भीषण आहे की याने जगातील बलाढ्य देशही डळमळले आहेत, परंतु आपण या संकटातून संधी शोधत 21व्या शतकावर भारताचे नाव कोरायचे आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

आत्मनिर्भरतेच्या पर्वासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा मंगळवारी केली. देशाची आत्मनिर्भरता, आत्मबळ आणि आत्मविश्वास दृढ करणार्‍या त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला जनता निश्चितच साथ देईल.

देशातील यापुढचा चौथा लॉकडाऊन आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळा, नव्या स्वरुपाचा असेल असे सांगतानाच आपण नियमांचे पालनही करू आणि पुढेही जाऊ असे अत्यंत दिशादर्शक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात मंगळवारी केले. देशाची यापुढील वाटचाल स्पष्ट करतानाच मोदीजींनी श्रमिक, शेतकरी, मध्यमवर्ग या सार्‍यांच्याच उपजीविकेला आधार देणारे, आत्मनिर्भर भारत अभियानाचा महत्त्वाचा भाग असलेले 20 लाख कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेजही या वेळी जाहीर केले. देशाच्या जीडीपीच्या 10 टक्के असलेले हे अभूतपूर्व पॅकेज प्रत्येक वर्गातील भारतीयांना या संकटकाळात बळ देईल याविषयी तीळमात्रही शंका नाही. 24 मार्च रोजी मोदीजींनी जगभरातील सर्वात कठोर मानल्या गेलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. या पहिल्या लॉकडाऊनमध्ये लोकांना केवळ अन्न आणि औषध या गरजांकरिताच घराबाहेर पडण्याची मुभा देण्यात आली, पण तिसर्‍या लॉकडाऊनपासूनच निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात झाली. तिसर्‍या लॉकडाऊनमधील सारे निर्बंध चौथ्या लॉकडाऊनमध्ये असणार नाहीत असे आपले ठाम मत असल्याचे मोदीजींनी सोमवारी स्पष्ट केले होते, असे मुख्यमंत्र्यांसोबतच्या त्यांच्या कॉन्फरन्सनंतर सरकारी गोटातून सांगण्यात आले. यामुळेच देशातील लॉकडाऊन तिसर्‍यांदा वाढवला जाईल अशी अटकळ सोमवारच्या कॉन्फरन्सनंतर मोठ्या प्रमाणात व्यक्त करण्यात आली होती. लॉकडाऊन 4चे स्वरुप 18 मेच्या आधी स्पष्ट केले जाईल, असे मोदींनी आता सांगितले आहे. राज्यांनी सध्याच्या नियमांमध्ये त्यांना हवे असलेले बदल येत्या 15 तारखेपर्यंत सूचवावेत, असे आवाहन पंतप्रधानांनी कॉन्फरन्समध्ये केले. त्यामुळे त्या-त्या राज्यांतील चित्र बहुदा काही दिवसांत स्पष्ट होईल. संपूर्ण जिल्हाच रेड झोन म्हणून घोषित करण्याऐवजी निव्वळ कंटेनमेंट झोनच रेड झोन मानले जावेत अशी अनेक राज्यांची मागणी आहे. सहा आठवड्यांच्या लॉकडाऊननंतर राज्यांची आर्थिक घडी विस्कटल्यामुळे राज्यांना कंटेनमेंट झोनच्या बाहेर आर्थिक व्यवहार सुरू व्हावेत असे प्रकर्षाने वाटते आहे. एव्हाना कोरोनाचा फैलाव कुठल्या भौगोलिक क्षेत्रात आहे ते स्पष्ट झाले आहे. सरकारी यंत्रणेला जिल्हा पातळीवरील व्यवस्थापनाचा अंदाज आला आहे. यापुढे एकीकडे आपल्याला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा आहे, तर दुसरीकडे मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करीत जनव्यवहारही वाढवायचा आहे आणि ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला एकत्रित प्रयत्न करायचे आहेत. कोरोनाचे संकट अभूतपूर्व आहे. अनेक बलाढ्य देश याने डळमळले आहेत, तर अर्थव्यवस्थेच्या पुनर्उभारणीचे आव्हान जगातील अनेक देश कसेबसे पेलत आहेत. अशा परिस्थितीत मोदीजींनी देशाची पुढील वाटचाल अतिशय सुस्पष्टपणे रेखाटली आहे. यात त्यांनी संघटित, असंघटित क्षेत्रातील प्रत्येकाला सोबत घ्यायचे आहे यावर भर दिला आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून आणि खंबीर नेतृत्वातून आपण हा संकटकाळ निश्चितपणे तरून जाऊ याची देशातील प्रत्येक नागरिकाला निश्चितच खात्री आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply