मुरूड ः प्रतिनिधी
पुण्यातील कसबा पेठ येथील सात जणांचा समूह मुरूड समुद्रकिनारी फिरण्यासाठी आला असता एका दुर्दैवी अपघातात 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पर्यटक गणेश पवार (40) आणि त्यांचा मुलगा वेदांत पवार (15) पॅरासेलिंग करताना आकाशात उडाले. या वेळी पॅराशूट आकाशात उडताच अगदी काही मिनिटांतच वर गेलेल्या
पॅराशूटची दोरी निखळल्यामुळे दोघेही जमिनीवर आदळल्यामुळे गंभीर जखमी झाले. यातील वेदांतच्या डोक्याला मोठी दुखापत झाल्याने नाकातून व कानातून रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगून दोघांना तातडीने अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे हलवण्यात आले, परंतु अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचताच वेदांतला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
काल सकाळी पुणे येथील पर्यटक आपल्या खासगी गाडीने मुरूड समुद्रकिनारी फिरण्यास आले होते. सदर समूहात सात जणांचा समावेश होता. यातील गणेश पवार आणि त्यांचा मुलगा वेदांत पॅराशूटने आकाशात उडताच पॅराशूटची दोरी निखळल्यामुळे 50 ते 60 फुटांवरून दोघेही बापलेक पडल्यामुळे जबर जखमी झाले. सदरची घटना कळताच डॉ. मंगेश पाटील यांनी सरकारी रुग्णालयात पोहचून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत केली.
त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी सुमय्या शेख यांनीही रुग्णास वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मुरूडमधील नगरसेवक व पदाधिकार्यांनाही रुग्णालयात पोहचून मदत केली. नानासाहेब झांबरे यांनी सदर घटनेची फिर्याद मुरूड पोलिसांत दिली आहे. या घटनेचा मुरूड पोलीस अधिक तपास करीत असून पॅराशूटचालकावर अद्याप कोणताही गुन्हा अथवा अटक करण्यात आली नाही.
याबाबत मुरूड बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे यांच्याशी संपर्क साधला असता समुद्राच्या स्पीड बोटीवरून आकाशात उडणार्या पॅराशूटला मेरीटाइम बोर्डाकडून परवानगी दिली जाते. चारचाकी वाहनांच्या साहाय्याने पॅराशूट उडवणार्यांना आम्ही परवानगी देत नाही. हे बेकायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper