कर्जत ः बातमीदार
पर्यटनावर 100 टक्के अवलंबून असलेल्या माथेरानमध्ये अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः बंद असून तेथील रहिवासी आणि मजूरवर्गाला कोणताही रोजगार सध्या नाही. त्यामुळे शासनाने माथेरानमधील दुर्बल घटकाला आणि सामान्य माणसाला आर्थिक साह्य करावे, अशी मागणी जोर धरत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे डोंगरावर वसलेल्या माथेरानमधील रहिवाशांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कायम समस्यांच्या गर्तेत असलेल्या विविध समस्यांवर मात करण्यासाठी माथेरानमध्ये आजही संघर्षमय जीवन नेहमीप्रमाणे जगावे लागत आहे. पर्यटन व्यवसाय हाच मुख्यतः जगण्याचा आधार असल्याने लॉकडाऊनमुळे
कुणाच्याही हाताला काम नाही. आजवर अनेक ठिकाणांहून मदतीचा हात दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आला आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने ज्यांच्याजवळ जमापुंजी शिल्लक होती त्यांनी कुटुंबातील सदस्यांच्या उदारनिर्वाहासाठी खर्च केली असून सर्वसामान्य लोकांकडे आर्थिक रक्कम शिल्लक नसल्याने पावसाळ्यातील चार महिने कसे जगायचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
माथेरानमध्ये साधारणतः 900 कुटुंबे असून यातील 100 कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तर उर्वरित 800 कुटुंबांना पैशांअभावी मोठी झळ आणि येणार्या समस्यांना तोंड देताना नाकी नऊ येणार आहेत. लॉकडाऊन असल्याने माथेरानमधील सामान्य जनतेचे हाल होत असून लॉकडाऊनच्या काळात शासनाने प्रतिकुटुंबाला दरमहा पाच हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नगर परिषद मुख्याधिकार्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी याबाबतची सत्यस्थिती आणि स्पष्ट अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. माथेरानमधील गरजूंना काही ठिकाणांहून जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स दानशूर व्यक्तींच्या वतीने देण्यात आल्या आहेत. मध्यमवर्गीय कुटुंब कुणाकडे हात पसरणार हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घोड्यांच्या खाद्यासाठी तर चोहोबाजूंनी मदत उपलब्ध झाली असून अनेक घोडेवाल्यांच्या संपर्कातील दानशूर व्यक्तींनी ठरावीक घोडेवाल्यांसाठी मुबलक पशुखाद्याचा पुरवठा केला. काही घोडेवाल्यांच्या घरात शिल्लक पशुखाद्य असतानाही मिळणार्या मदतीसाठी पुढे जात आहेत. पिढ्यान्पिढ्या तुटपुंज्या पगारावर अवलंबून असलेला इथला माळी कामगार हा नेहमीच मदतीपासून वंचित राहिल्याचे बोलले जात आहे. हातरिक्षा चालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असताना या श्रमिकांकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. लॉकडाऊन असल्याने व्यवसायावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे येणार्या कठीण काळात शासनाने प्रति कुटुंबाला लॉकडाऊन संपेपर्यंत आर्थिक मदत करावी जेणेकरून वीज, पाणी बिले नागरिकांना भरता येतील, असे सर्व स्तरातून बोलले जात आहे.