Breaking News

…म्हणून आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला ः फडणवीस

नागपूर ः प्रतिनिधी
मराठा समाजाला दिलेले आरक्षण जर टिकले असते, तर त्याचे सर्व श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडल्याचा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विषयाची संवेदनशीलता पाहता आतापर्यंत मी राजकीय न बोलण्याचे ठरविले होते, मात्र अशोक चव्हाण, नवाब मलिक हे ज्या पद्धतीने खोटे आणि राजकीय आरोप करीत आहेत, त्यानंतर मी स्पष्ट बोलतोय. आम्ही केलेला कायदा या सरकारला टिकवता आला नाही. कारण तो टिकला असता तर त्याचे श्रेय भाजपला मिळाले असते. म्हणूनच या सरकारने जाणीवपूर्वक या आरक्षणाचा मुडदा पाडला, असे फडणवीस म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर अनेक आरोप केले होते. त्या आरोपांना प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी अशोक चव्हाण आणि नवाब मलिकांनी लावलेल्या आरोपांना थेट उत्तर दिले. न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या याचिका राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत होत्या. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या, असा थेट आरोपही फडणवीस यांनी केला. मराठा आरक्षणाला विरोध करणार्‍या याचिका भाजपच्या लोकांनी केल्या होत्या, असा आरोप नवाब मलिक यांनी केल्यानंतर फडणवीसांनी हा प्रतिआरोप केला आहे.
जर आज आम्ही सत्तेत असतो, तर जसे आम्ही उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा कायदा टिकविला होता, सरन्यायाधीश यांच्यासमोरही त्यास स्थगिती येऊ दिली नव्हती तसेच समन्वय साधून आम्ही सर्वोच्च न्यायालयातही तो कायदा टिकविला असता, असा दावाही फडणवीस यांनी केला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply